‘तिकीट नाकारल्याचे समजताच अडवाणी संतापले होते’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:06 AM2019-04-17T04:06:52+5:302019-04-17T04:07:20+5:30
लोकसभा निवडणुकीत ७५ वर्षांवरील वयाच्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे हे पक्षाचे सरचिटणीस (संघटना) राम लाल यांनी वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना सांगितल्यावर ते संतापले.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ७५ वर्षांवरील वयाच्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे हे पक्षाचे सरचिटणीस (संघटना) राम लाल यांनी वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना सांगितल्यावर ते संतापले. ‘हा निर्णय कोणी घेतला? हा निर्णय केव्हा व कुठे घेतला गेला?’ असे त्यांनी विचारले. अडवाणींकडून असा प्रतिसाद त्यांना अपेक्षित नव्हता म्हणून त्यांनी ‘मला हा निरोप पोहोचवायची जबाबदारी दिली’ हे सांगितले. हा निर्णय कसा घेतला गेला एवढे तरी सांगा, असे अडवाणी त्यांना म्हणाले. परंतु, त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते. नंतर राम लाल यांनी मुरली मनोहर जोशींना असाच निरोप दिला. त्यांची प्रतिक्रिया काय होती हे समजले नाही. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना अस्वस्थ वातावरणाची जाणीव होताच त्यांनी अडवाणी आणि जोशी यांना व्यक्तिश: फोन केले.