पक्षाची दुर्दशा झालेले दुसऱ्यांना सल्ले देताहेत- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:37 AM2019-04-24T03:37:07+5:302019-04-24T06:47:48+5:30

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता केली टीका

Advising the party's misery to others- Uddhav Thackeray | पक्षाची दुर्दशा झालेले दुसऱ्यांना सल्ले देताहेत- उद्धव ठाकरे

पक्षाची दुर्दशा झालेले दुसऱ्यांना सल्ले देताहेत- उद्धव ठाकरे

Next

ठाणे : काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका, असे आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे, ते तरी सांगा, असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

ठाण्यात मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव यांची महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर जाहीर सभा झाली. जोपर्यंत माझ्यावर तुमचा विश्वास आहे, तोपर्यंत मी या पदावर राहीन, नाहीतर राजीनामा देईन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माढ्यातून सेनापतीनेच माघार घेतली. मग, सैनिक कसे लढणार, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे त्यांना सैनिकांच्या शौर्यावर टीका करताना लाज कशी वाटत नाही, असा सवाल ठाकरे यांनी शरद पवार यांना केला. सैन्याच्या शौर्यावर टीका करणारी हीच मंडळी इशरत जहॉंच्या घरी सांत्वनाला गेली होती. अशा लोकांनी आम्हाला शौर्याचे धडे शिकवू नयेत, असे ते म्हणाले.

आघाडी सरकारने ६० वर्षांत जे घोटाळे केले, ते पाच वर्षात कसे काय साफ करणार? आम्ही जे करून दाखवतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच करून दाखवतो, असेही ठाकरे म्हणाले. युती होणार नाही, म्हणून आघाडीने आधीच दिल्लीत जाण्याची स्वप्ने पाहिली होती, त्यांचे खातेवाटही झाले होते. म्हणजेच, विविध खात्यांत जाऊन काय काय खायचे, हे सुद्धा ठरले होते. परंतु, आमची युती झाली आणि त्यांचे मनसुबे हाणून पाडल्याने त्यांनी त्यावेळी टीका केली.

मागील साडेचार वर्षांत आमच्यात काही मतभेद होते, परंतु आता आम्ही एकत्र आलो आहोत. मी जे काही मुद्दे मांडले होते, ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्या मान्य झाल्यानेच ही युती झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तुम्ही युतीबरोबर आहात की नाही, असा सवाल करून उपस्थितांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. उपस्थित शिवसैनिकांनी त्याला होकारार्थी प्रतिसाद दिला.

ठाण्यातही करमाफी
मी मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केली तशीच ठाण्याचीही करणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी पुन्हा स्पष्ट केले. ठाणेकर संकटाच्या काळात माझ्यामागे उभे राहिले होते, आजही ते उभे आहेत, उद्याही ते असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘राहुल गांधी यांचा मताधिकार काढून घ्या’
कल्याण : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले, तर ३७० कलम रद्द करू, असे आम्ही सांगत आहोत, तर काँग्रेस आघाडीचे नेते राहुल गांधी हे ३७० कलम रद्द करणार नाही, असे सांगत आहेत. देशाच्या सुरक्षेशी छेडछाड करणाºया अशा नेत्यांचा निवडणूक लढवण्याचा मताधिकार काढून घ्या. हीच खरी निवडणूक आचारसंहिता असेल, अशी आग्रही मागणी शिवसेनापक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका मैदानात महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. याप्रसंगी पक्षप्रमुख ठाकरे यांनी उपरोक्त मागणी केली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, महापौर विनीता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेशी छेडछाड करणाऱ्यांच्या हाती सरकार देणार आहात का, याचा मतदारांनी विचार करावा. आघाडीच्या काळात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले. मोदी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. भारताने जी अण्वस्त्रे तयार केली आहेत, ती काय पूजा करायला ठेवलेली नाहीत. वेळ आली तर पाकिस्तानवर हल्ला करू, अशी भाषा मोदी करत असताना मेहबुबा मुफ्ती त्याला विरोध करताहेत. मतदारांनी मते देताना याचा विचार करणे गरजेचे आहे.

ठाकरे म्हणाले की, ५६ पक्ष एकत्रित येऊन जी आघाडी झाली आहे, ती केवळ बिनबुडाचीच नसून बिनचेहऱ्यांचीही आहे. त्यांच्यातील प्रत्येकजण पंतप्रधान होण्यासाठी उतावीळ झाला आहे. शरद पवारांना राहुल गांधी व गांधी यांना पवार पंतप्रधान झालेले चालणार आहेत का, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

Web Title: Advising the party's misery to others- Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.