औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय

By कुणाल गवाणकर | Published: January 13, 2021 07:46 PM2021-01-13T19:46:51+5:302021-01-13T19:48:50+5:30

औरंगाबाद-संभाजीनंतर आणखी एका नामांतरावरून शिवसेना-काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता

after aurangabad cmo twitter handle uses dharashiv for osmanabad | औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय

औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय

Next

मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) ट्विटर अकाऊंटवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. सीएमओकडून करण्यात आलेल्या ट्विटबद्दल काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध राहील, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. तर आधी जे म्हणत आलोय, तेच म्हणतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपण संभाजीनगरवर पूर्णपणे ठाम असल्याचा संदेश काँग्रेसला दिला.

पुढेही हेच करणार; 'संभाजीनगर'वरील थोरातांच्या आक्षेपानंतरही मुख्यमंत्री ठाकरे जोरात

औरंगाबाद-संभाजीनगरवरून सुरू असलेला वाद शमला असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देताना उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना-काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'धाराशिव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे,' असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संभाजीनगर-औरंगाबादवरून शिवसेना वि. काँग्रेस
औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात गेल्याच आठवड्यात राजकारण रंगलं. मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद येथील वैद्यकीय खात्यासंदर्भात निर्णय झाला. याची माहिती देताना CMO च्या ट्विटर हँडलवरून मंत्री अमित देशमुख यांच्यासह संभाजीनगर (औरंगाबाद) असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं. मात्र त्यानंतरही CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्यानं CMOनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला होता.

CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

मुख्यमंत्री ठाम, काँग्रेस नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा उल्लेख करत असल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध कायम असल्याची भूमिका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार असल्याचं ठणकावून सांगितलं. 'मी नवीन काय केलंय? आतापर्यंत मी जे बोलत आलोय, बाळासाहेब जे बोलत आलेत, तेच मी बोलतोय, तेच करतोय आणि पुढेही तेच करणार. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सेक्युलर अजेंड्यात औरंगजेब बसत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा संभाजीनगर म्हटल्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 'छत्रपती संभाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र आमचा नामांतराला आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाला विरोध आहे. महाविकास आघाडीनं किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे मतभेदांचे मुद्दे चर्चेतून सोडवू. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पटवून देऊ,' असं थोरात यांनी म्हटलं.

Web Title: after aurangabad cmo twitter handle uses dharashiv for osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.