बीड, अहमदनगरनंतर भाजपाला मुंबईतही फटका; राजधानीत मुंडे समर्थकाचा पहिलाच राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:51 PM2021-07-12T21:51:53+5:302021-07-12T21:55:03+5:30
बीड, अहमदनगर येथून अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई – केंद्रीय कॅबिनेट विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यातच पंकजा मुंडे मंगळवारी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक घेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सगळ्यांचेच लक्ष पंकजा मुंडे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. कॅबिनेट विस्तारात डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आल्यानं मुंडे समर्थक नाराज आहेत. बीड, अहमदनगर येथून अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.
आता राजधानी मुंबईतही मुंडे समर्थकाने राजीनामा दिला आहे. भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी राजीनामा दिला आहे. डमाळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईलअशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आलं. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या विस्तारासाठी आपलं आयुष्य खर्ची केले असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत तोच वारसा घेऊन पंकजाताई आणि प्रीतमताई दिवसरात्र पक्षविस्तारासाठी मेहनत घेत आहेत. या दोन्ही मुंडे भगिनींकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी चिटणीसपदाचा राजीनामा देत आहे असल्याचं डमाळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
प्रीतमताईला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी वा ती नाराज नाही. अन्यायाची भावना ही समर्थकांमध्ये असते. लोकांच्या भावना बदलणे हे माझे काम नाही, ते काळानुसार होत राहील. जनता त्यांच्या प्रेमातून नेतृत्वाची उंची तयार करते. आमचं फक्त नाव नाही, वारसा आहे, कर्तृत्व, वक्तृत्वही आहे. प्रीतम यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हीना गावित यांचेही होते. प्रीतमचे नाव योग्यच होते. मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर ती कष्टाळू, हुशार आहे, बहुजन चेहरा आहे या शब्दात पंकजा यांनी बहिणीचे कौतुक केले.
भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. जे प्रमुख व्यक्ती आहेत ते ठरवतात. अनेकांची नावे चर्चेत होती, ती न येता नवीन नावे आली. पक्षश्रेष्ठींनी नवनवीन लोकांना संधी दिली. त्यांच्यात गुण असल्याचे पक्षाला जाणवले असेल व त्यांचा फायदा पक्षाला किती झाला हे भविष्यात कळेल, असे मतही पंकजा यांनी व्यक्त केले.
पंकजा मुंडेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक घेतली. यात ११ सचिवांच्या सोशल मीडियाचा रिपोर्ट पंतप्रधान मोदींच्या हातात होता. यात २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले. कोणत्या सचिवांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून मतप्रदर्शन केले याची माहिती पंतप्रधानांकडे होती. पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय दिला पंकजा मुंडेंना सल्ला? #PankajaMunde#BJP#NarendraModihttps://t.co/IyWiOIfHdE
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021
लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. तसेच बीड जिल्ह्यातील एका मुस्लीम व्यक्तीनं गोशाळा बांधलीय, त्यांना केंद्राने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या पद्मश्रींना तुम्ही जाऊन भेटला का? असा सवाल पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. लोकांशी नाळ तोडू नका असा सल्ला त्यांनी पंकजा यांना दिला.