एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर

By प्रविण मरगळे | Published: October 22, 2020 08:24 AM2020-10-22T08:24:07+5:302020-10-22T08:25:53+5:30

Eknath Khadse, Pankaja Munde, Shiv Sena News: एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेत्यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली आहे.

After Eknath Khadse leave from BJP now Shiv Sena offer Pankaja Munde to join Party | एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर

एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर

Next
ठळक मुद्देमागच्या वर्षी भाजपानं जी भरती केली होती त्याला उतरती कळा लागली आहे. भाजपातील आणखी ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं कळतं, पंकजा मुंडेंसाठी शिवसेनेचं दार नेहमी उघडंपंकजा मुंडे यांच्यावर नेहमीच बाळासाहेबांनी प्रेम केलं, त्या शिवसेनेच्या कुटुंबातील आहे.

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी एकनाथ खडसे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधतील, खडसेंच्या भाजपा सोडण्याने पक्षाला मोठा धक्का बसला असताना आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यादेखील भाजपामधील ओबीसी समाजातील नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या सक्रीय राजकारणातून दूर झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम करणार असल्याचं जाहीर केले होते, गापीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे पक्षावर नाराजी व्यक्त केली होती, त्यावेळी एकनाथ खडसेंनी त्याच व्यासपीठावरून भाजपाच्या पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले होते.

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेत्यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं अशी ऑफर दिली आहे. भाजपानं जे पेरलं तेच आता उगवायला लागलं आहे. मागच्या वर्षी भाजपानं जी भरती केली होती त्याला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते राष्ट्रवादीत जात आहेत. भाजपातील आणखी ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं कळतं, पंकजा मुंडेंसाठी शिवसेनेचं दार नेहमी उघडं आहे. पंकजा मुंडे यांचे स्वागत आहे असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

तर ज्यांनी भाजपा पक्ष मोठा केला, त्या नेत्याची पंकजा मुंडे मुलगी आहे. पंकजा मुंडे यांच्यावर नेहमीच बाळासाहेबांनी प्रेम केलं, त्या शिवसेनेच्या कुटुंबातील आहे. बीडमध्ये पंकजा यांच्या भगिनी खासदारकीला उभ्या राहतात तेव्हा शिवसेनेनं कधीही उमेदवार दिला नाही हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं अशी ऑफर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.  

पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशा चर्चा त्यावेळी रंगत होत्या. मात्र अलीकडेच पंकजा मुंडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा पंकजा सक्रीय राजकारणात उतरल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

एकनाथ खडसेंच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसला – पंकजा मुंडे

एकनाथ खडसे भाजपा सोडणार नाही असं मला वाटत होतं, पण त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच स्पष्ट करतील, खडसेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे ही यावर काही टिप्पणी करणार नाही, आम्ही वेळोवेळी एकनाथ खडसेंशी बोलायचा प्रयत्न केला परंतु यश आलं नाही, एकनाथ खडसे यांच्या जाण्याने निश्चित दु:ख आहे. पण भाजपाचा गड शाबूत राखण्यासाठी पक्ष कायम प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली होती.

फडणवीसांनी पक्ष सोडण्यास मला भाग पाडले - खडसे

माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Web Title: After Eknath Khadse leave from BJP now Shiv Sena offer Pankaja Munde to join Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.