Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या मोठ्या निर्णयानंतर रक्षा खडसेंनीही भाजपाबाबत केली भूमिका स्पष्ट, म्हणाल्या...
By बाळकृष्ण परब | Published: October 21, 2020 04:58 PM2020-10-21T16:58:17+5:302020-10-21T17:01:19+5:30
Eknath Khadse News : एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, खडसेंच्या सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनीही भाजपाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीभाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत राज्यातील राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. आता एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, खडसेंच्या सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनीही भाजपाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर रक्षा खडसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, रक्षा खडसे म्हणाल्या की, मी भाजपा सोडून जाणार नाही. मी भाजपामध्येच राहणार आहे. एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजपाला रामराम ठोकला आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्यामुळे मी भाजपामध्येच राहीन.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनीही रक्षा खडसे ह्या भाजपा सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेत तो त्यांच्या निर्णय आहे, असेही ते म्हणाले होते. त्याबरोबरच आपल्यासोबत एकही आमदार आणि खासदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे राज्यातील विविध भागांमधील आमदार आपल्या संपर्कात असल्याचे विधान करून राजकीय खळबळ उडवून दिली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.