Video: “संजय राऊतनंतर शिवसेनेचा आणखी एका नेता PMC बँक घोटाळ्याचा लाभार्थी”
By प्रविण मरगळे | Published: January 5, 2021 11:26 AM2021-01-05T11:26:45+5:302021-01-05T11:28:49+5:30
Shiv Sena Sanjay Raut, PMC Bank Scam: शिवसेनेचा आणखी एक नेता जो खासदार राहिलेला आहे, तेदेखील पीएमसी घोटाळ्याचे लाभार्थी राहिल्याचं समोर आलं आहे
मुंबई – पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबांची चौकशी सुरु असताना आता या प्रकरणात आणखी एका शिवसेना नेत्याचं नाव समोर आलं असल्याचं भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या या विधानानं तो शिवसेना नेता कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमवारी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची तब्बल ४ तास चौकशी केली आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, PMC बँक, HDIL प्रविण राऊत घोटाळ्याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. अशाचवेळी या चौकशीतून एक गोष्ट बाहेर आली की, शिवसेनेचा आणखी एक नेता जो खासदार राहिलेला आहे, तेदेखील पीएमसी घोटाळ्याचे लाभार्थी राहिल्याचं समोर आलं आहे, त्यांच्या कुटुंबाचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
#संजयराऊत नंतर #शिवसेने चा आणखी एक नेता पीएमसी बँक घोटाळा चा लाभार्थी !! चौकशी व्हायलाच हवी @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil@mipravindarekarpic.twitter.com/tXfyTnVV72
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2021
पीएमसी बँकेतील ठेवींबाबत चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी वर्षा राऊत यांनी केली होती. तेव्हा ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वर्षा राऊत या एक दिवस आधीच ईडीसमोरच चौकशीसाठी उपस्थित राहिल्या होत्या.
पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली.
शिवसेना ईडी कार्यालयावर काढणार होती मोर्चा?
वर्षा राऊत ५ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे जाणार असल्याची चर्चा होती. याच वेळी शिवसैनिकांकडून ईडी कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा होत्या. मात्र, त्यावर राणे यांनी तिखट शब्दात शिवसेनेवर हल्लाही चढविला होता. ‘शिवसेना ईडी ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही, हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही, हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी, म्हणून निघाला नाही, पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा,’ असे सांगत हाच का महाराष्ट्र धर्म? असा प्रश्न नितेश राणे यांनी समाजमाध्यमाद्वारे केला होता.
मोर्चाच्या बातमीवर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सायंकाळी आपली भूमिका समाजमाध्यमांवर मांडली. निदर्शनाच्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे, तेव्हा उतरू, पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? असे सांगतानाच, शिवसेनेची शक्ती पाठीशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले होते.