कोण उधळणार विजयाचा भंडारा : सुप्रिया सुळेंपाठोपाठ कांचन कुल यांचेही जय मल्हार !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:58 PM2019-04-12T18:58:22+5:302019-04-12T19:09:50+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि राज्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार राहुल कुल यांच्यासह दर्शन घेतले.
पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि राज्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार राहुल कुल यांच्यासह दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध 'पाचपावली'ची प्रथा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवसांपूर्वी आघाडीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनीही पती सदानंद सुळे यांच्यासोबत खंडोबा दर्शन केल्याने खंडोबा कोणाला पावणार या चर्चेला ऊत आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुल परिवाराकडून कांचन कुल यांच्या विजयाचे साकडे खंडोबाला घालण्यात आले. बारामती खंडोबा गडाच्या पायऱ्या चढताना कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांना 5 पायऱ्या घेवुन गड चढावा असा हट्ट धरला.अखेर कार्यकर्त्यांचा हट्ट पुर्ण करत त्यांनी पत्नीला उचलले. असाच आग्रह काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दर्शनासाठी आलेल्या सदानंद सुळे यांना झाला होता. त्यावेळी त्यांनीही सुप्रिया सुळे यांना उचलण्याचा प्रयत्न केला होता.
जेजुरी आणि अष्टविनायकातील मोरगाव अशी दोन प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या मतदारसंघात येतात. प्रचाराच्या काळात उमेदवारांचे सर्व देवदेवतांचे दर्शन सुरु असतेच. मात्र सुळे यांचाच कित्ता कुल यांनी गिरवल्यामुळे मतांचे दान कोणाच्या पदरात पडणार आणि विजयाचा भंडारा कोण उधळणार याचीच उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.