Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 01:37 PM2024-10-06T13:37:33+5:302024-10-06T13:40:16+5:30
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ 2024: शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दादाजी भुसे यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला आहे. खासदार संजय राऊतांनी मालेगाव दौऱ्यात या नेत्याचे नाव जाहीर करून टाकले.
Maharashtra Vidhan Sabha elections 2024: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होईल. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही वेगवेगळ्या भागात दौरे करत असून, मालेगाव दौऱ्यात संजय राऊतांनी दादाजी भुसे यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, हे सांगून टाकले.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र-खान्देशच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी संजय राऊत मालेगावमध्ये होते. मालेगावातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा (महाविकास आघाडी) उमेदवार कोण असेल, याबद्दल भाष्य केले.
दादाजी भुसे विरुद्ध अद्वय हिरे
संजय राऊत म्हणाले, "विधानसभेचे तिकीट मातोश्रीवरून दिले जाते. दिल्लीवरून दिले जात नाही. बच्छाव यांचे पुत्र त्यांच्या समर्थकांसह मला भेटले. मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे हेच महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार असतील. मालेगावची जनता त्यांना साथ देईल. मालेगावचे भावी आमदार तेच आहेत", असे सांगत राऊतांनी दादाजी भुसेंविरोधात अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर करू टाकली.
बंडूकाका बच्छाव यांचीही तयारी
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारंसघातून बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव हे सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी दोन मेळावे घेत शक्तीप्रदर्शन केले आणि स्वतःची उमेदवारीही जाहीर केली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती, पण राऊतांनी अद्वय हिरे यांचे नाव जाहीर करून टाकल्याने ती शक्यता संपली आहे.