अघोरी! उमेदवारांच्या नावाचा कागद स्मशानात; ग्राम पंचायत मतदानादिवशी उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:14 PM2021-01-15T14:14:31+5:302021-01-15T14:15:27+5:30
Gram panchayat Election Kalyan : महिनाभरापूर्वी एका घरात पालकमंत्री एकनाश शिंदे यांच्यावर देखील अघोरी काळीजादू करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांच्या कारला अपघात झाला होता.
कल्याण : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यात ग्राम पंचायतनिवडणूक होत आहे. यामध्ये समोरच्या पॅनलचा काटा काढण्यासाठी स्मशानात उमेदवारांची नावे असलेला कागद कणकेच्या गोळ्यात खोचलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला, मात्र अजूनही अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात. विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. याला महिना होत नाही तोच कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण ग्रामीणमधील आणे-भिसोळ ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. वाघेरापाडा स्मशानभूमीत निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची नावे हाती लिहिलेला कागद सापडला आहे. हा कागद कणकेच्या गोळ्यामध्ये खोवण्यात आला आहे. कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रचार संपला आहे. या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघेरा पाडातील एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत आलेले असताना त्यांना हा प्रकार दिसला. एका चितेशेजारी कणकेचा गोळा ठेवण्यात आला होता. ग्रामस्थांनी हा कागद उचलून पाहिला तेव्हा त्यावर उमेदवारांची नावे दिसली. यामुळे खळबळ उडाली होती.