'सर्जन'ला पर्याय 'कुलगुरूं'चा ? : राष्ट्रवादीत अहमदनगरच्या उमेदवाराचा खल सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 01:43 PM2019-03-16T13:43:07+5:302019-03-16T13:44:27+5:30
भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे हे न्युरोसर्जन असल्याने त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीकडून माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना मैदानात उतरविले जाईल, या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
अहमदनगर : भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे हे न्युरोसर्जन असल्याने त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीकडून माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना मैदानात उतरविले जाईल, या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. राष्ट्रवादीकडून पहिल्या दोन याद्यांमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेला नाही. हा विलंब का केला जात आहे, याबाबत शंका उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप किंवा त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांचे नाव जाहीर केले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, तो निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.
अरुण जगताप यांचे संघटन व नातेसंबंध मोठा आहे. मात्र, केडगाव हत्याकांडानंतर झालेले राजकारण त्यांच्या प्रचाराच्या आड येईल की काय ही शंका आहे. तरुण चेहरा म्हणून संग्राम जगताप यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र ते स्वत: इच्छुक नसल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीनंतर शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरमध्ये भाजपसोबत युती केली होती. प्रचारात हा मुद्दा भाजपाकडून उपस्थित केला जाऊ शकतो.
उच्चशिक्षित उमेदवार म्हणून माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे हा एक पर्याय राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी नांदेड व लखनौ या दोन विद्यापीठांचे कुलगुरुपद भूषविले. नगर शहरात ते दीर्घकाळ प्राचार्य होते. मागासवर्ग आयोगावर सदस्यही आहेत. निमसे हे मूळचे नगर तालुक्यातील असून त्यांना उमेदवारी दिल्यास राजकारणबाह्य सामान्य चेहरा दिला, असा प्रचार राष्ट्रवादी करू शकेल. सर्जन व शिक्षणसम्राट विरुद्ध कुलगुरु अशी लढत राष्ट्रवादीला उभी करता येईल, असाही एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे.