Afghanistan Taliban Crisis: “मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:49 AM2021-08-17T08:49:39+5:302021-08-17T08:52:00+5:30
एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले असून, सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली आहे.
नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवला असून, आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने एकेक करून अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा मिळवला. या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील नेत्यांनीही यावर मते मांडण्यास सुरुवात केली असून, काहींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले असून, सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली आहे. (aimim asaduddin owaisi criticised centre government over taliban afghanistan crisis)
अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?
सन २०१३ मध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत केलेल्या एका भाषणादरम्यान भारताने तालिबानशी संवाद कायम ठेवायला हवा. या चर्चेच्या माध्यमातून राजकीय हितांचे संरक्षण करायला हवे, असे म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी तेव्हाच सांगितले होते की, अफगाणिस्तानातील आपल्या हितांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तालिबानशी राजकीय स्तरावर संवाद सुरू केला पाहिजे. भारताने अफगाणिस्तानात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. कोणत्याही सरकारने या बाजूकडे लक्ष दिलेले नाही. आता यावर भारत सरकार काय करणार, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.
तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार
तालिबानच्या हालचालींवर चिंता केली होती व्यक्त
सन २०१९ मध्ये अफगाणिस्तानातील तालिबानच्या हालचालींवरून चिंता व्यक्त केली होती. संसदेत यासंदर्भातील गोष्टींचा पुनरुच्चार केला होता. पाकिस्तान, अमेरिका आणि तालिबान यांची मॉस्को येथे एक बैठक झाली होती, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची किती वेळा गळाभेट घेतली, हे सांगण्यात व्यस्त होता. अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका काय हे अद्यापही स्पष्ट नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.
“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र
दरम्यान, संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत. तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका, असे आदेश तालिबानींना देण्यात आले आहेत.