शीख समाजासाठी लढणारा अकाली दल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:32 AM2019-04-21T04:32:36+5:302019-04-21T04:33:11+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला शिरोमणी अकाली दल हा एकमेव राजकीय पक्ष आजही शीख समाजाचे प्राबल्य असलेल्या पंजाबमधील एक प्रबळ राजकीय शक्ती आहे.

Akali Dal fights for Sikh community! | शीख समाजासाठी लढणारा अकाली दल!

शीख समाजासाठी लढणारा अकाली दल!

Next

- वसंत भोसले

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला शिरोमणी अकाली दल हा एकमेव राजकीय पक्ष आजही शीख समाजाचे प्राबल्य असलेल्या पंजाबमधील एक प्रबळ राजकीय शक्ती आहे. गुरुद्वारांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती अखंड पंजाबमध्ये होती. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यावर पश्चिम पंजाब भारतात आणि पूर्व पंजाब पाकिस्तानात समाविष्ट झाला. दोन्ही देशांत पंजाब नावानेच आजही प्रांत अस्तित्वात आहेत. या प्रबंधक समितीची राजकीय आघाडी म्हणून १४ डिसेंबर, १९२० रोजी अकाली दलाची स्थापना सरदार सरमुख चुब्बल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. प्रामुख्याने शीख समाजाच्या राजकीय इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा पक्ष स्थापन केला गेला. या पक्षाने स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका लढविल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंतची प्रत्येक निवडणूक अकाली दलाने लढविली आहे. (१९३७ ते २०१७) त्यामुळे प्रादेशिक अस्मितांचे राजकीय धु्रवीकरण करणारा हा भारतातील सर्वांत जुना पक्ष आहे.

आजही काँग्रेस पक्ष विरुद्ध अकाली दल ही दोन पंजाब राज्यातील शक्तिस्थाने आहेत. मात्र, अकाली दलाने कट्टर धार्मिक राजकारण कधी केले नाही. पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी दहशतवाद सुरू झाला, तेव्हा राजकीय भूमिका घेण्यावरून अकाली दलाची राजकीय कोंडी झाली होती. काही नेत्यांचा अपवाद वगळता अकाली दलाने दहशतवादास समर्थनही दिले नाही आणि प्रखर विरोध केला नाही. त्यामुळे अकाली दलाच्या अनेक नेत्यांचे या दहशतवादात बळी गेले आहेत.

अकाली दलाने पंजाब प्रांतिक निवडणुकांबरोबरच लोकसभेच्या आजवरच्या सर्व सार्वत्रिक निवडणुका लढविल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत सहा वेळा घवघवीत यश मिळाले, तर दहावेळा किरकोळ यश मिळाले आहे. पंजाब प्रांत विधिमंडळाच्या निवडणुका १९३७ पासून लढविणाऱ्या अकाली दलास १९६९ मध्ये प्रथम यश आले. गुरुनाम सिंग यांच्या नेतृत्वाखाली १७ फेब्रुवारी रोजी अकाली दलाचे सरकार स्थापन करता आले. त्यानंतर, सात वेळा अकाली दलाचे सरकार राज्यात स्थापन झाले. अकाली दलाचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनी दुसरे मुख्यमंत्री होण्याचा मान १९७० मध्ये पटकाविला. त्यानंतर पाचवेळा त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले. त्यांनी १९ वर्षे त्या पदावर राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

अकाली दलाने स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लीम लीगच्या प्रभावाला विरोध करण्यासाठी काँग्रेसशी एकदा आघाडी केली होती; मात्र बहुमत न मिळाल्याने विरोधात बसावे लागले होते. लोकसभेच्या आजवरच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकाली दलाचा सामना सातत्याने काँग्रेसशीच झाला. जेव्हाजेव्हा काँग्रेसविरोधातील राजकीय शक्ती एकत्र आल्या, तेव्हा अकाली दलाने त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. जनता पक्षाच्या सरकारमध्ये अकाली दल होता. तेव्हा सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या होत्या. सन १९९६ ते २००४ या काळात झालेल्या चारही निवडणुकीत पंजाबच्या राजकारणावर अकाली दलाचे वर्चस्व राहिले. भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अकाली दल हा एक प्रमुख घटक राहिला.

देशात ठिकठिकाणी पर्यायी राजकीय शक्ती निर्माण झाल्या. त्यांनी काँग्रेसला पर्याय दिला. काँग्रेसविरोधात लढत राहिले. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसविरोधात लढणाºया अकाली दलाची जागा कोणी घेऊ शकले नाही, हे विशेष होय. जनता पक्ष, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष ते भाजपपर्यंत कोणत्याही पक्षाला अकाली दलावर मात करणे आणि पंजाबमध्ये काँग्रेसविरोधात आणि शीख समाजाचे राजकारण करणारी शक्तिशाली ताकद उभी करणे जमलेले नाही. आजही भाजप हा त्यांचा दुय्यम सहकारी आहे आणि प्रमुख विरोधक काँग्रेसच आहे.
अकाली दलात वेळोवेळी फूट पडली, फुटीर गटांना तात्पुरता विजय मिळाला, पण ते गट शिल्लक राहिले नाहीत. आता प्रकाशसिंग बादल यांचे चिरंजीव सुखबीर हेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. सर्व प्रादेशिक पक्षांप्रमाणेच तिथेही घराणेशाही आहे. अकाली दलाच्या अनेक नेत्यांवर तर अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचाही आरोप आहे. तरीही तेथील बहुसंख्य शिखांना कदाचित धार्मिक कारणांमुळे असेल, पण तोच आपला पक्ष वाटतो. 

अकाली दलात वेळोवेळी फूट पडली, फुटीर गटांना तात्पुरता विजय मिळाला, पण ते शिल्लक राहिले नाहीत. आता प्रकाशसिंग बादल यांचे चिरंजीव सुखबीर पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. पक्षात घराणेशाही आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांवर अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचाही आरोप आहे.
 

Web Title: Akali Dal fights for Sikh community!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.