Sachin Vaze: तिन्ही पक्ष अस्वस्थ, अनेकांचे बिंग फुटणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:56 AM2021-03-28T06:56:26+5:302021-03-28T06:57:06+5:30
महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचे काम कुणी केले? वाझेसारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या.
नागपूर : पोलीस दलातील बदल्यांबाबत फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळे काँग्रेससह तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचे काम कुणी केले? वाझेसारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांचे नाव झाले ते सांगा, असा सवालही त्यांनी केला. एनआयए चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत. वाझे काय बोलणार? याची त्यांना भीती वाटत आहे. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाची दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावाही त्यांनी केला.
‘त्या’ डीव्हीआरचा बॅकअप मेन सर्व्हरला
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारल्यावर ते म्हणाले, सावंतांना मी काय उत्तर द्यायचे? त्यांना काय समजते? रोज ते काहीही बोलतात, आमचे राम कदम त्यांना उत्तर देतील. पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केला तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे. प्रायव्हेट डीव्हीआर नष्ट करणे सोपे आहे. पण, पोलिसांचा डीव्हीआर गायब करणे सोपे नाही.
केंद्राच्या लस अजून पूर्ण वापरल्या नाहीत
देशातील कोरोनाची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष कोरोना नियंत्रणाचे उपाय राबविले पाहिजेत, असे ते म्हणाले.