अनिल देशमुखांवरील आरोपाने राजकारण गढूळ, चिंताजनक, विचारवंतांचे गृहमंत्र्यांना पाठबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:02 AM2021-04-03T08:02:07+5:302021-04-03T08:02:34+5:30
शासकीय सेवेतील एक अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात आणि त्यावरून सार्वजनिक आयुष्यात तीस वर्षे निष्कलंकपणे काढलेल्या राजकीय नेत्याला चौकशीला सामोरे जावे लागते. हे राजकीय धुळवडीने गढूळ झालेले महाराष्ट्राचे वातावरण विचित्र व चिंताजनक आहे
नागपूर : शासकीय सेवेतील एक अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात आणि त्यावरून सार्वजनिक आयुष्यात तीस वर्षे निष्कलंकपणे काढलेल्या राजकीय नेत्याला चौकशीला सामोरे जावे लागते. हे राजकीय धुळवडीने गढूळ झालेले महाराष्ट्राचे वातावरण विचित्र व चिंताजनक आहे, अशा शब्दांत उपराजधानीतील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व बुद्धिजीवी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठबळ दिले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र, सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, उच्च न्यायालयातील सुनावणी, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचा राज्य सरकारचा निर्णय या घडामोडींमुळे उडालेला राजकीय धुराळा या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, डॉ. पूरण मेश्राम, अरूणा सबाने, डॉ. प्रदीप विटाळकर, प्रा. डॉ. दिवाकर गमे, बबन नाखले आदींनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
सार्वत्रिक चिंता, नापसंती
या जाहीर निवेदनाबाबत ‘लोकमत’ने डॉ. सुखदेव थोरात, डॉ. यशवंत मनोहर, गिरीश गांधी, डॉ. पूरण मेश्राम आदींशी संपर्क साधला असता सर्वांनीच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप व त्यावरून राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीबाबत स्पष्ट शब्दांत नापसंती व्यक्त केली. आम्ही व्यक्त केलेली ही भावना सगळ्याच सुजाण नागरिकांच्या मनात आहे. हा मुद्दा सर्वच दृष्टींनी संवेदनशील असल्याने जारी केलेल्या निवेदनाशिवाय वेगळे सांगण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
निष्कलंक सार्वजनिक आयुष्य
गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करतीलच. परंतु, गेली ३० वर्षे ते सार्वजनिक आयुष्यात वावरत आहेत. गृहमंत्री बनण्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत. त्याआधी त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. इतक्या वर्षांच्या राजकारणात त्यांच्यावर कधी असे आरोप झाले नाहीत.
अशा खानदानी नेतृत्वावर आरोपाचे पत्र व त्यावरून चौकशी हे सर्वसामान्य व समाजासाठी अनाकलनीय आहे. विशेषत: दोन महिन्यांनंतर स्थापनेचा ६१ वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोपात प्रशासन किंवा प्रशासनातील उच्चाधिकारी यापूर्वी कधीही सहभागी झाले नव्हते.
यामुळे कधी नव्हे इतके राज्याचे राजकारण गढूळ बनले आहे आणि सुजाण नागरिकांना हे अजिबात पसंत नाही. म्हणून ही सार्वत्रिक भावना आम्ही ठामपणे व्यक्त करीत आहोत, असे या मान्यवरांनी निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही अत्यंत विचित्र अवस्था असून सुजाण नागरिकांनी आपली यासंदर्भातील नापसंती स्पष्टपणे व्यक्त करून या विचित्र राजकारणाचा विरोध केला पाहिजे, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे.