“...तर मला क्लीनचीट द्यावी; माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 02:47 PM2021-07-06T14:47:28+5:302021-07-06T14:49:47+5:30
Vidhan Sabha Adhiveshan Live Update: या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे असं त्यांनी विधानसभेत सांगितले.
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षावरून झालेल्या गोंधळात भाजपाचे १२ आमदार निलंबित झाले. आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्यावर झालेले आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरील आरोप आहेत असं सरनाईकांनी म्हटलं आहे.
विधानसभेत प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) म्हणाले की, माझ्यावर आरोप करून विनाकारण सरकारची बदनामी केली जाते. जर मी गुन्हा केला असेल तर शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु गुन्हाच केला नसेल तर मला या आरोपातून क्लीनचीट देण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. MMRDA विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने माझ्यावर आरोप करण्यात आले. याबाबत मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र दिलं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे. मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण घोटाळाच झाला नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असेल तर मला राज्य सरकारकडून या प्रकरणात क्लीनचीट द्यावी. लवकरात लवकर हा अहवाल गृहमंत्र्यांनी सादर करावा. तो लोकांपर्यंत पोहचवावा. जेणेकरून लोकांसमोर सत्य समोर येईल असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
याआधी प्रताप सरनाईक काय म्हणाले होते?
माझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होते.
माझ्या पक्षाच्या प्रतोदाने व्हीप बजावला आहे. त्यामुळे अधिवेशनाला आलो. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असंही प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं होते.