आश्चर्यकारक कलाटणी; राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात!
By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 04:58 PM2021-01-14T16:58:22+5:302021-01-14T17:02:54+5:30
Dhananjay Munde Rape Allegation News: तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने पुन्हा पोलीस ठाणे गाठलं,
मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला भाजपाचा नेता धावला आहे. धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असं विधान पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केल्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ शकतो असंही म्हटलं जात आहे.
तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने पुन्हा पोलीस ठाणे गाठलं, त्यावेळी पोलीस या प्रकरणात सहकार्य करत नसून तपास करणारी अधिकारी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आहे असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलाने केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
याचवेळी धनंजय मुंडे यांच्या मदतीला भाजपाचा नेता धावला आहे. मुंबईतील भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत, त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कृष्णा हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रेणु शर्मा २०१० पासून माझ्यावर रिलेशिप ठेवण्यासाठी दबाव आणत होती, माझ्या सूत्रांकडून माहिती पडले की ही महिला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे वसूल करते. मी या महिलेला दुर्लक्षित करत होतो. या महिलेने अनेकांना अशाप्रकारे लुबाडले आहे. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच २०१५ पर्यंत ही महिला मला फोन कॉल, मेसेज करून भेटण्यासाठी बोलवत होती. परंतु मी टाळाटाळ करत होतो. मी स्पष्ट शब्दात रेणु शर्माला कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही असं बजावलं होतं. ६ आणि ७ जानेवारीलाही तिने मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले, मी इमोजीशिवाय अन्य काहीही प्रतिक्रिया दिली नाही. २ दिवसांपूर्वी या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप लावल्याचं मी मीडियात वाचलं तेव्हा मला धक्का बसला. तेव्हा मी या महिलेविरोधात पोलीस तक्रार करण्याचं ठरवलं, आज ती महिला धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहे, काही वर्षांपूर्वी मला करत होती उद्या भविष्यात अन्य कोणाला टार्गेट करू शकते, त्यामुळे या महिलेविरोधात सखोल चौकशी करून ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि हनी ट्रपचा तपास करावा अशी मागणी कृष्णा हेगडे यांनी केली आहे.
एकीकडे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत असताना दुसरीकडे मात्र भाजपाने सावध प्रतिक्रिया घेतली होती, त्यात आता भाजपाच्या नेत्याने पुढे येऊन तक्रारदार महिलेविरोधात गंभीर आरोप केल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळणं लागलं आहे. यातच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे प्रकरणी काय भूमिका घेतं हे पाहणं गरजेचे आहे.
कारवाई करण्याचे शरद पवारांचे संकेत
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप गंभीर आहेत, त्यांनी माझी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. हे प्रकरण कोर्टातही सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेली माहिती पक्षाच्या बैठकीत सर्व सहकाऱ्यांना सांगितली जाईल. त्यानंतर पक्ष म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन, कोणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे असं सांगत धनंजय मुंडे प्रकरणात कारवाई करण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणतात...
“धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी सांगितले. तसेच, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.