'अमित शहांनी स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:23 AM2019-04-22T05:23:37+5:302019-04-22T06:58:20+5:30
प्रकाश आंबेडकर यांची टीका
कऱ्हाड (जि. सातारा) : पाच वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात, आम्ही पाकिस्तानचे २०० सैनिक मारले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणतात की, आम्ही एकही पाकिस्तानी सैनिक मारलेला नाही. अमित शहांनी बहुतेक स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले असतील. गेल्या पाच वर्षांत अशाच प्रकारे खोटे बोलण्याचे काम मोदींनी केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पाकिस्तानवरील हल्ल्यात किती ठार झाले? याबाबत पंतप्रधान मोदी एक तर अमित शहा दुसरीच आकडेवारी सांगत आहेत. मात्र सुषमा स्वराज सर्जिकल स्ट्राईकमध्ये एकही सैनिक न मेल्याचे खरे बोलत आहेत. अशा खोटं बोलणाऱ्या मोदींना पुन्हा सत्तेवर बसवल्यास लुटारूंचे राज्य येईल, असे त्यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक असतात ते जे बोलतात ते प्रत्येक भारतीयाचे मत मानले जाते. मात्र पंतप्रधान मोदी व अमित शहा हे किती खोटे बोलतात याला सीमा नाहीत. खोटारड्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच वेळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना हे पक्ष जळालेल्या भाकरीच्या दोन बाजू आहेत. त्या करपल्या असून, त्यांचा आता काहीच उपयोग उरलेला नाही. या भाकरीवर पाणी मारण्याची हीच वेळ आहे.
नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल
पुणे : शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा, असे सांगत आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. राज्यात काँग्रेस तिसºया स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही काँग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपसोबत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.