आता चर्चा अमित ठाकरेंची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 09:39 PM2018-07-18T21:39:51+5:302018-07-18T21:49:10+5:30
हँडसम हंक असणाऱ्या अमित यांना कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचं ओझंही पेलावं लागणार आहे. त्यामुळे राजकारणातल्या या नव्या ठाकरेच्या अधिकृत प्रवेशाची सर्वानाच उत्सुकता आहे.
पुणे : राज ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राला नवे नाही. मागील काही निवडणुकांमध्ये अपयश आले असले तरी येत्या काळात मनसे ठाकरे पुन्हा आपला करिष्मा दाखवतील अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र यावेळी त्यांच्या आशा फक्त राज यांच्यावरच नाही तर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे लागल्या आहेत.
आज पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत नीट परीक्षा,दूध आंदोलन असे अनेक विषय मांडले. याच पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत आलेले मात्र शांतपणे मागे बसून त्यांचे विचार ऐकणाऱ्या अमित यांच्याकडे सर्वांचीच नजर होती. साधा पांढरा शर्ट, ग्रे पॅन्ट आणि लाल गॉगल अशी स्टाईल ठेवणारे अमित अजून मनसे कल्चरमध्ये फारसे रुळलेले नाहीत. ते मनसेच्या कार्यालयात सध्या ये-जा करतात मात्र अजून तरी त्यांना ठामपणे मत मांडताना पाहिलं नसल्याचं कार्यकर्ते सांगतात. असं असल तरी कार्यकर्त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकून घेत त्यांना फोटो काढण्यास ते मनाई करत नाहीत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांच्यासोबत अमितदेखील औरंगाबादला गेले आहेत. ते राजकारणात येणार, मनसेला सावरणार अशी चर्चा असली तरी त्याला पक्षातून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दुसरीकडे त्यांची आणि आदित्य ठाकरे यांची तुलना होण्यासही सुरुवात झाली आहे. अर्थात आदित्य आधीपासून युवासेनेच्या कामातून पुढे येऊन जाहीर राजकरणात आले आहेत. आता अमित कसा प्रवेश करतात हेच बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हँडसम हंक असणाऱ्या अमित यांना कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचं ओझंही पेलावं लागणार आहे. त्यामुळे राजकारणातल्या या नव्या ठाकरेच्या अधिकृत प्रवेशाची सर्वानाच उत्सुकता आहे.