अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मनसेत मिळणार मोठी जबाबदारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:25 AM2021-07-17T10:25:15+5:302021-07-17T10:27:58+5:30
मनसेचे नेते अमित ठाकरे मुंबईहून नाशिकला रवाना; मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकमध्ये
मुंबई/नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांना तातडीनं नाशिकला बोलावल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे पुत्र अमित ठाकरेंवर लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांना नाशिकमध्ये बोलावण्यात आलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे सध्या नाशकात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिरोडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर आता शिरोडकर यांच्याकडे असलेली जबाबदारी अमित ठाकरेंना मिळणार असल्याची चर्चा आहे. तसा आग्रह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंकडे धरला आहे. अमित ठाकरे पक्षाचा युवा चेहरा असल्यानं त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरेंना दिली जाऊ शकते.
अमित ठाकरेंचं आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल?
सध्या पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असलेल्या आदित्य ठाकरेंनी २०१२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. 'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या', असं भावुक आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य यांच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली होती. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आदित्य यांनी युवासेनेची जबाबदारी स्वीकारली. विद्यापीठातील निवडणुका, विद्यार्थ्यांचे प्रश्न याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष घातलं. आता राज यांनी अमित ठाकरेंकडे मनविसेची जबाबदारी दिल्यास ते आदित्य यांच्या पावलावर पाऊल टाकतील.
आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला. राज यांचे खास मित्र आणि भागीदार राजन शिरोडकर यांचे पुत्र असलेले आदित्य यांनी सेनेत प्रवेश केल्यानं मनसेला धक्का बसला आहे. राजन शिरोडकर यांच्याकडे मनसेची आर्थिक सूत्रं होती. आदित्य यांनी पक्षाची संघटनात्मक जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली. २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. आदित्य यांनी मनसेला रामराम केल्यानं आता विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद रिक्त आहे. ती जबाबदारी अमित यांना मिळाल्यास विद्यार्थी सेनेची नव्यानं बांधणी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.