...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा
By कुणाल गवाणकर | Published: October 14, 2020 09:39 AM2020-10-14T09:39:15+5:302020-10-14T09:45:30+5:30
CM Uddhav Thackeray Governor Bhagatsingh Koshyari: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये संघर्ष
मुंबई: मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटर वॉर सुरू आहे. हिंदुत्वाची आठवण करून देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी 'माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही,' अशा शब्दांत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संघर्षावर प्रतिक्रिया आल्या. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री
काल (मंगळवारी) रात्री अमृता फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केलं. 'वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,' अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. आता यावर शिवसेना नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाह प्रशासन - bars and liquor shops are wild wide open but temples are danger zones ?
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 13, 2020
Definitely sometimes ‘certificate’ is required to prove the saneness of some dicey creatures who are incapable of having SOPs in place ! 🤔🙄 #Maharashtra
मुख्यमंत्री वि. राज्यपाल; सामना जोरात
‘तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या 'सेक्युलर' शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो 'सेक्युलर' शब्द तुम्ही स्वीकारला आहे, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. एकीकडे राज्यात बार, रेस्टोरंट आणि समुद्र किनारे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे देव-देवता मात्र लॉकडाऊनमध्ये अडकून पडले आहेत. मागच्या तीन महिन्यात विविध शिष्टमंडळांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली. यात धार्मिक नेते, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे.
पत्राच्या सुरुवातीलाच ठाकरे यांना उद्देशून राज्यपाल म्हणतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशी संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.
'होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश होता, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलंय, ते अतिशय दुर्दैवी आहे - देवेंद्र फडणवीस
माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही!
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. तसेच महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा सणसणीत टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.
‘मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का?’ असा प्रश्न राज्यपालांनी पत्रात विचारला होता. त्यावर ठाकरे म्हणतात, आपल्याला असा प्रश्न का पडावा? आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र मी एवढा थोर नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे ‘सेक्युलर’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभाच ‘सेक्युलर’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का, असा सवाल ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.
'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
ठाकरे पुढे म्हणतात, इतर राज्यात, देशात बरेवाईट काय घडते आहे, ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. आपल्याला अनेक शिष्टमंडळांनी भेटून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत विनंती केली. त्यातली तीन पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो! प्रार्थना स्थळं उघडण्याबाबत सरकार जरुर विचार करत आहे. पण जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे होते तसेच तो एकदम उठवणे देखील अयोग्य आहे. घरोघरी जाऊन उपचार करणारे महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य आहे, अशी आठवण करून देत, ठाकरे यांनी राज्यपालांच्या विनंतीचा सरकार गांभीर्याने विचार करत असून, सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी खात्री देतो असेही ठाकरे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्र्यांची भाषा दुर्दैवी
शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात : ‘त्यांची’ भाषा घटनाविरोधी
राज्यातील धर्मस्थळे सुरू करण्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातली भाषा घटनाविरोधी असून राष्ट्रपतींना ते मान्य आहे का, असा सवाल प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
संजय राऊत : आमचं हिंदुत्व पक्कं आहे
'उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचं हिंदुत्व पक्क असून भक्कम पायावर उभं आहे, आमचा आत्मा हिंदुत्वाचा
आहे, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पवारांनी व्यक्त केली पंतप्रधानांकडे नाराजी
मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी वापरलेल्या भाषेबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. पवार म्हणतात, सर्व धर्मांना समान न्याय देणारी धर्मनिरपेक्ष घटना देशाने स्वीकारली आहे. घटनेतील तत्वांचा आदर केला पाहिजे. मात्र राज्यपालपदाची प्रतिष्ठा ढासळत आहे. राज्यपालांच्या पत्रातील भाषेची आपण नोंद घेतली असेलच. पत्रातील भाषा, आशय या दोन्ही गोष्टी घटनात्मक पदावर असणाऱ्यांना साजेशा असाव्यात.