Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:00 AM2021-03-23T03:00:38+5:302021-03-23T06:02:52+5:30

Sachin Vaze, Param Bir Singh: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला

Anil Deshmukh: Abhay to Anil Deshmukh! Parambir Singh's allegation is not factual, followed by Sharad Pawar | Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

Next

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाच्या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती होते. त्यामुळे सिंग यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याने देशमुख हे राजीनामा देणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार  ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यांना १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाली; त्यानंतर १५ दिवस ते घरीच विलगीकरणात होते. देशमुख रुग्णालयात भरती असल्याचा रेकॉर्ड आहे.   २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरीच आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यता नाही. 

महाराष्ट्र एटीएस योग्य दिशेने तपास करत आहे, त्यांचा तपास विचलित करण्यासाठी असे आरोप होत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या, असा जर परमबीर सिंग यांचा आरोप आहे. तर मग आरोप करण्यासाठी परमबीर यांना एक महिना का थांबावे लागले? असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

पवार न्यायाधीश नाहीत!  - खा. गिरीश  बापट
देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची पवार यांनी हवा काढल्यानंतर भाजपचे खा. गिरीश बापट म्हणाले की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप करणे ही गंभीर बाब आहे. राज्य सरकार नालायक असून कुंपणच शेत खायला निघाले आहे. या प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत, असेही ते म्हणाले.

परमबीर केंद्राचा पोपट -शिवसेना
परमबीर सिंग हे केंद्राचा बोलका पोपट असून महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार त्यांचा वापर करून घेत असल्याचा आरोप शिवसेनेचे खा. विनायक राऊत आणि माजी मंत्री अरविंद सावंत यांनी केला. ते महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलत होते.  

राज्यसभेत भाजप सदस्यांचा गोंधळ! 
राज्यसभेत सोमवारी भाजपच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींविषयी गोंधळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. शून्य तासाच्या शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी पक्षाच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी याला परवानगी दिली नाही.

Web Title: Anil Deshmukh: Abhay to Anil Deshmukh! Parambir Singh's allegation is not factual, followed by Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.