अनिल देशमुख निर्दोष सुटतील : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:29 PM2021-04-24T12:29:21+5:302021-04-24T12:48:49+5:30
AnilDeshmukh HasanMusrif Kolhapur : भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयने ताब्यात घेतले असून त्यांची पुन्हा चौकशी सुरु झाली आहे, याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी ते निर्दोष सुटतील अशी प्रतिक्रिया दिली.
कोल्हापूर : भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयने ताब्यात घेतले असून त्यांची पुन्हा चौकशी सुरु झाली आहे, याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी ते निर्दोष सुटतील अशी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, लेटरबॉम्ब फोडून भाजप सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. एनआयएकडे तपास देवून महिना उलटला तरी अजून तपास कसा पूर्ण झाला नाही, असा सवाल केला.
परमवीर सिंग यांच्या आडून भारतीय जनता पक्षाने चाल खेळली असून याप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सकाळी केला. यापूर्वीच ज्या दिवशी लेटरबॉम्ब प्रसिद्ध झाले, त्याचवेळी मी वक्तव्य केले होते कि ही भाजपची सोचीसमझी चाल आहे.
परमवीरसिंग दिल्ल्लीत गेले, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले, पहाटे अडीच वाजता अमित शहा यांची भेट घेतली आणि सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला. पुरावा नसताना अशा प्रकारे सीबीआयकडे तपास वर्ग देणे म्हणजे विरोधी पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजपने रचलेले कट कारस्थान आहे. हे कदापिही चालू देणार नाही.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जे स्फोटके सापडली, त्याचा तपास एनआयए करत आहे, त्याला महिना होऊन गेला तरी अजून तो पूर्ण झालेला नाही. सचिन वाझे याचा पोलीस कोठडी संपली, न्यायालयीन कोठडी संपली तरी त्याला अजून बाहेर सोडलेले नाही. आता अनिल देशमुख यांची चौकशी सुरु केली आहे, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही आणि ते निर्दोष सुटतील असा विस्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.