Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:13 AM2021-08-25T09:13:05+5:302021-08-25T09:14:07+5:30
Narayan Rane: शिवसेना-भाजपची जुंपली; राणेंच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागे एका राजकीय नेत्याचा दबाव आहे, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला बळाचा वापर करून अटक करण्याची सूचना देत आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची सभा होती. त्या सभेनंतर पत्रकार परिषद सुरू होण्याआधी पालकमंत्री अनिल परब यांचे दोन फोनवर संभाषण झाले. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
मुंबईतून आंदोलनाची सुरुवात
नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर युवासेनेने एकत्र येत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणेसमर्थक आणि युवासैनिक समोरासमोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने - सामने आले व दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी नाशिकमध्ये साेमवारी मध्यरात्री राणेंविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक राणेंच्या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचा वैयक्तिक राग असेल, पण त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही.
- जयंत पाटील,
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
कोंबड्या उडवून खिल्ली
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद येथे आ. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. उस्मानाबादमध्ये शिवसैनिकांनी कोंबड्या उडवून राणे यांची खिल्ली उडवणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करत प्रेतयात्रा काढून घोषणाबाजी करण्यात आली.
कोंबड्या आणि मांजरी
मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला म्हणून शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारात मांजर सोडले. याच्या जोडीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असंसदीय घोषणांची राळ उडवत आंदोलने करत दिवसभर धुळवड खेळली. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणे व भाजपाच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.