ठाण्यात मनसेला धक्का, आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा, एकाधिकारशाहीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 03:38 PM2020-11-21T15:38:41+5:302020-11-21T17:34:42+5:30
Thane : याआधी डॉ. ओंकार माळी आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे.
ठाणे : पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ठाण्यातील आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
ओवळा माजिवडा उपविभाग अध्यक्ष प्रलय साटेलकर असे या पदाधिकाऱ्यांचे नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत ठाण्यातूनच पोहोचून दिले जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याआधी डॉ. ओंकार माळी आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे.
ठाणेमनसे म्हणजे अविनाश जाधव असे समीकरण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. त्यांना कोणती जबाबदारी दिली जात नाही. राज ठाकरेंवर नाराज नाही. गेले अनेक दिवस पक्षात घुसमट होत होती शेवटी कंटाळून शनिवारी राजीनामा दिल्याचे साटेलकर यांनी सांगितले.
मनसेकडून आरोपांबद्दल स्पष्टीकरण
प्रलय साटलेकर हे बरेच वर्षे पक्षात कार्यरत नव्हते असे तेथील मनसैनिकांचे म्हणणे आहे. तरीही त्यांच्याशी संपर्क करून त्यांची म्हणणे जाणून घेऊ आणि नाराजी दूर करू. तसेच, राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणाचीही अडवणूक केली जात नाही, त्यांना थेट भेटता येते. दिवाळी आम्ही सर्व मनसैनिकांना घेऊन भेटायला गेलो होतो. तसेच, अविनाश जाधव हे ठाणे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरू आहे.- रवींद्र मोरे, ठाणे शहर अध्यक्ष