जनतेत मोदी विरोधी सुप्त लाट : नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:49 PM2019-04-16T20:49:32+5:302019-04-16T20:52:23+5:30
राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या, सामुहिक उन्मादामुळे (मॉब लिंचिंग) हत्यांकडाच्या घटनांत वाढ झाली, पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होऊ लागल्या, देशात काळे धन येण्या ऐवजी नोटबंदीमुळे काळ््याचे पांढरे केले गेले. अशा सर्व घटनांमुळे प्रचारातून विकासाचा मुद्दा हद्दपार झाला आहे. त्यामुळे लोकांना आता मोदी नकोसे झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात मोदी विरोधी सुप्तलाट असल्याचे मत कॉंग्रेसच्या दलित सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि रोजगार हमीचे माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. जम्मू कामीर येथील ३७० कलम काढून टाकणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा सरकार आणू पहात आहे. ईशान्य भारताला देखील ३७० कलमासारखा विशेष दर्जा आहे. तेथे मात्र, मोदी वेगळी भूमिका घेताना दिसतात. उलट ईशान्य भारतात वेगळा ध्वज देण्यासही ते तयार आहेत.
देशामधे नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या पुरोगामी आणि विचारवंतांची हत्या होत आहे. गो मांस बाळगल्याच्या संशयावरुन लोकांना मारले जात आहे. सामाजिक उन्मादाच्या घटनांतही वाढ झाली आहे. या सर्वांमुळे नागरिक मोदींविरोधात जाऊ लागले आहेत. त्यामुळे, देशभरात मोदींविरोधात लाट दिसून येत आहे. अगामी लोकसभेच्या निवडणूकीत मोदींविरोधात मतासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे राऊत म्हणाले.
भाजपाच्या फायद्यासाठीच आंबेडकर आले नाहीत
भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाच ते सहा जागा देण्यास आघाडीची तयारी होती. मात्र, त्यांनाच सोबत यायचे नव्हते. त्यांची भूमिका संविधान विरोधी दिसत आहे. अन्यथा भाजपाचा पराभव करण्यासाठी ते आघाडीसोबत असते. उलट, भाजपाच्या फायद्यासाठीच ते आघाडीसोबत आले नसल्याची टीका नितीन राऊत यांनी केली.