शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले
By हेमंत बावकर | Published: October 28, 2020 10:21 PM2020-10-28T22:21:16+5:302020-10-28T22:24:04+5:30
Big Boss jan kumar sanu: बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला.
मुंबई: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानूविरोधात मनसे, शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेने तर सानूला तुला लवकरच थोबडवणार, अशी थेट धमकी दिली होती. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये केले. यावर बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या 'कलर्स' वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मनसेला पत्र लिहून माफी मागितली होती. मनसेने इंग्रजी-मराठी पत्रावरून थेट उद्धव ठाकरेंनाच डिवचले आहे.
तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी
'२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषणांचा आम्ही सन्मान करतो,' असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना व राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत आणि राज ठाकरेंना मराठीत हे पत्र पाठविण्यात आले आहे. यावरून आता पुन्हा मराठीचे राजकारण रंगले आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मराठीतील पत्र फेसबुकवर पोस्ट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शुद्ध मराठीतील माफीनामा... बाकीच्यांन सारखे इंग्रजी लेटर घेऊन शांत बसले नाहीत! असा टोला लगावतानाच महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असेही सुनावले आहे.
बिग बॉसमध्ये नेमके काय झाले?
बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. 'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.