"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 09:07 PM2024-10-17T21:07:34+5:302024-10-17T21:10:50+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर भाजपातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.

Aspiring BJP candidates have warned Party that if Warora Assembly Constituency is given to Eknath Shinde's Shiv Sena, there will be rebellion. | "वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात

"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात

योगेश पांडे,नागपूर 
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झाला नसताना विविध शक्यतांच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमधील तसेच इच्छुकांमधील अस्वस्थता वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेला (शिंदे) जाण्याच्या चर्चेने वेग पकडल्यामुळे तेथील भाजपचे पदाधिकारी व शंभराहून अधिक कार्यकर्ते नागपुरातील पक्षाच्या विभागीय कार्यालयात धडकले. जर ती जागा शिंदे गटाला गेली, तर तेथे बंडखोरी अटळ असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे भाजपसमोरील पेच वाढला आहे.

वरोऱ्याची जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेच्या वाट्याला गेली आणि शिंदेसेनेकडून काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चेने गुरुवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले.

भाजपाचे इच्छुक अस्वस्थ

भाजपच्या इच्छुकांना यामुळे धक्का बसला. त्यामुळे तेथील इच्छुक उमेदवार रमेश राजुरकर, ओमप्रकाश मांडवकर यांनी तडकाफडकी कार्यकर्त्यांना घेऊन नागपूर गाठले. त्यांनी भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांची भेट घेतली.

वरोऱ्याची जागा शिंदेसेनेकडे जात असल्याच्या चर्चांबाबत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. वरोरा येथे भाजपचेच वर्चस्व आहे. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर आम्ही आमच्या नेत्यांना बंडखोरी करण्यासाठी बाध्य करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

Web Title: Aspiring BJP candidates have warned Party that if Warora Assembly Constituency is given to Eknath Shinde's Shiv Sena, there will be rebellion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.