Assam Assembly Elections 2021: आसामला घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही : अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:22 AM2021-04-01T05:22:17+5:302021-04-01T05:23:37+5:30
Assam Assembly Elections 2021 News : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली जमीन यशस्वीपणे मुक्त केली आहे.
बिजनी : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली जमीन यशस्वीपणे मुक्त केली आहे.
चिरांग जिल्ह्यात बिजनी येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, अजमल हे दावा करतात की, आगामी सरकारची किल्ली त्यांच्या हातात असेल. मात्र, त्यांना याची कल्पना नाही की, कुलूप आणि किल्ली आसामच्या जनतेच्या हातात आहे. शहा यांनी काँग्रेसवर घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आम्हाला आणखी पाच वर्षे द्या. माणसेच काय पक्षीही घुसखोरी करू शकणार नाहीत. अमित शहा म्हणाले की, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी अजमल यांच्याबाबत म्हटले होते की, कोण आहेत अजमल. मात्र, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, एआययूडीएफ आसामची ओळख आहे. हे राज्य वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव, भारतरत्न गोपीनाथ बोरदोलाई आणि भूपेन हजारिका यांचे आहे.
आज मतदान
आसाम विधानसभा निवडणुकीत गुरुवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून त्यातून पाच मंत्री, उपसभापती आणि विरोधकांतील काही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य निश्चित होईल. या टप्प्यात २६ महिलांसह ३४५ उमेदवार मतदारांचा कौल मागत आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालेल.