Assam : महागाई-रोजगार बनला निवडणुकीचा मुद्दा, सीएए, भूमिहीनांचा प्रश्नही ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 05:14 AM2021-03-29T05:14:51+5:302021-03-29T05:15:20+5:30
Assam Assembly Elections 2021: आसाममध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ७७ टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी महागाई आणि रोजगार या मुद्यांवर राजकारण केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ७७ टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी महागाई आणि रोजगार या मुद्यांवर राजकारण केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात चहाच्या मळ्यात काम करणारे लाखो कामगार आहेत. त्यांना कमी रोजंदारी मिळते अशी तक्रार आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे की, सत्ता आल्यास या मजुरांची रोजंदारी ३६५ रुपये करण्यात येईल. देशात अन्य राज्याच्या तुलनेत या राज्यातील मजुरांची मजुरी कमी आहे. सध्या या मजुरांना १६७ रुपये रोजंदारी मिळते. महागाईच्या या काळात ही मजुरी अतिशय कमी असल्याची तक्रार आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांपुढील समस्या वाढल्या आहेत. निवडणुकीत हा मुद्दाही समोर येत आहे.
जानेवारीत आसाममध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाखापेक्षा अधिक लोकांना जमिनीचे प्रमाणपत्र दिले होते. मागील सरकारांनी भूमिहीनांना जमीन देण्यात रस दाखविला नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. भाजप सरकारने सव्वा दोन लाख कुटुंबांना जमिनीचा भाडेपट्टा दिला आहे, असे त्यांनी सांगितले होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात असा शब्द दिला आहे की, सरकारी मालकीच्या जमिनीचा भाडेपट्टा भूमिहीनांना देण्यात येईल.