दिल्ली, मुंबईच्या संस्थाकडून विधानसभानिहाय सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:29 PM2019-07-29T12:29:41+5:302019-07-29T12:30:44+5:30
निवडणूक : विद्यमान आमदारांसह इतर पर्यायांवर शोध
जळगाव : विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेने दिल्ली, मुंबई येथील बड्या संस्थाकडून सर्वेक्षण सुरु केले आहे. यात आमदारांसह इच्छुक उमेदवार व नव्या पर्यायी उमेदवारांबाबत नागरिकांचे मत जाणून घेतले जात आहे. येत्या पंधरा दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून पक्षश्रेष्ठींकडे याबाबतचा अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता राजकीय पक्षांनी देखील प्रत्येक निवडणुकीआधी नागरिकांचे मत जाणून घेवून निवडणुकीत योग्य उमेदवार कोण चांगला राहिल याबाबतचे सर्वेक्षण करून उमेदवार देण्यावर भर दिसून येत आहे. यासाठीच निवडणुकीच्या काही महिने अगोदरच मतदारसंघामध्ये सर्व्हे करून योग्य उमेदवाराच्या नावाबाबत माहिती जमा केली जात आहे. जिल्ह्यातील जळगाव शहर, ग्रामीण, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर या विधानसभांमध्ये भाजपा
भाजपाकडून वर्षभरात तीन वेळा सर्वेक्षण
जसा काळ बदलत आहे, त्यानुसार राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तंत्रासह निवडणुकीआधीच नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. यामध्ये भाजपाने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतलेली दिसून येत आहे. भाजपाने गेल्या वर्षभरापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून वर्षभरात भाजपाचे जिल्ह्यातील ११ विधानसभांमध्ये तीन वेळा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना अंतिम सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. २०१८ मध्ये जून-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तर यावर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे सर्वेक्षण व विधानसभा निवडणुकीचे सर्वेक्षण हे वेगवेगळ्या पातळीवरच करण्यात आले आहे.
अशी आहे प्रश्नावली
शिवसेनेच्या सर्वेक्षणात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने युती करावी की नाही ?, युती केली तर फायदा कोणाचा ?, पाच वर्षात सत्तेत राहून शिवसेनेने जनतेसाठी भाजपा विरोधात घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य ?, स्थानिक आमदारांचे काम कसे ? याबाबतची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातून सुुरु केलेल्या जनआशिर्वाद दौऱ्याचा आधी व त्यानंतर अशा दोन टप्प्यात हे सर्वेक्षण करण्यात आला.
ळगाव, चाळीसगाव, अमळनेरवर लक्ष
भाजपाच्या सर्वेक्षणात प्रामुख्याने जळगाव शहर, चाळीसगाव, अमळनेर या तीन्ही विधानसभांच्या जागांवर अधिक भर दिला जात आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे आता खासदार झाले असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेबाबत योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. तर अमळनेरला देखील अनेकजण भाजपाकडून इच्छुक असल्याने नागरिकांचे मत तपासले जात आहे. जळगाव शहराची जागेसाठी शिवसेनाही आग्रही असून, विद्यमान आमदार भाजपाचा आहे. अशा परिस्थितीत या जागेबाबतचा आढावा घेवून अंतिम अहवाल १० आॅगस्टपर्यंत पक्षश्रेष्ठींना देण्यात येणार आहे.