शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह मैदानात; भाजपाचा प्लॅन यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:47 AM2022-01-12T10:47:11+5:302022-01-12T10:47:39+5:30

Uttar Pradesh Assembly Election 2022: मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपाचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता

UP Assembly Election 2022: BJP Amit Shah Is Responsible For Handling The Situation | शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह मैदानात; भाजपाचा प्लॅन यशस्वी होणार?

शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह मैदानात; भाजपाचा प्लॅन यशस्वी होणार?

Next

नवी दिल्ली – आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी(UP Assembly Election 2022) भाजपाला अनेक धक्के मिळत आहे. त्यातच स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक आमदार राजीनामा देत असल्याने भाजपा हायअलर्टवर आली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी भाजपानं कमान गृहमंत्री अमित शाह यांच्या हाती दिली आहे. कुठल्याही प्रकारे मौर्य यांना रोखून भाजपाला लागलेली गळती थांबवण्याचं आव्हान शाह यांच्यासमोर आहे.

मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपाचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता. पवारांचा हा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह यांनी कंबर कसली आहे. भाजपात नाराज असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्री दारासिंह चौहान, राज्यमंत्री धर्मसिंह सैनी, आमदार ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य, विधान परिषद आमदार देवेंद्रप्रताप सिंह हे भाजपा सोडणार असल्याची बातमी व्हायरल झाली. त्यानंतर या नेत्यांना दिल्लीहून फोन येऊ लागले. जर काही नाराजी असेल तर बसून चर्चा करुया. नेतृत्व तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. परंतु घाईगडबडीत असा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्यामुळे पक्षाला आणि वैयक्तिक तुम्हाला राजकीय नुकसान होईल अशी हमी दिल्लीतून देण्यात आली आहे.

स्वामी प्रसाद यांच्यानंतर आणखी २ मंत्री, ६ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे. मंगळवारी दिवसभर चर्चा सुरु होती. परंतु अद्याप कुणी राजीनामा दिला नाही. परंतु काही काळात ते समाजवादी पक्षात सहभागी होतील असा दावा करण्यात येत आहे. मौर्य यांच्या दाव्याप्रमाणे १० ते १२ आमदार भाजपाचा राजीनामा देतील. ४ भाजपा आमदार राकेश राठौर, जय चौबे, माधुरी वर्मा आणि राधाकृष्ण शर्मा हे याआधीच समाजवादी पक्षात सहभागी झाले आहेत.

अमित शाह डॅमेज कंट्रोल करणार?

अमित शाह(Amit Shah) यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना जबाबदारी  दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांची ताकद भाजपाला चांगलीच माहिती आहे. मौर्य यांच्या राजकीय ताकदीचा फायदा भाजपाला २०१७ च्या निवडणुकीत झाला होता. तेव्हा स्वामी प्रसाद मौर्य बीएसपीचे ताकदवान नेते होते. निवडणुकीच्य काळात त्यांनी बसपाची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता. यूपीच्या निवडणूक आखाड्यात ओबीसी समुदायाचं किती महत्त्व आहे हे सर्वच राजकीय पक्षांना माहिती आहे.

यूपीत ओबीसी समाजाची लोकसंख्या ४२ टक्के आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने १२५ ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांची राजकीय ताकद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवली होती. जेव्हा मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील सदस्य धर्मेंद्र यादव यांना हरवून मौर्य यांची मुलगी खासदार म्हणून निवडून आली. आता स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपा सोडणं पक्षासाठी निवडणुकीच्या काळात अडचणीचं ठरु शकतं. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश येणार का? हे आगामी काळात ठरेल.   

Web Title: UP Assembly Election 2022: BJP Amit Shah Is Responsible For Handling The Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.