पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप
By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 04:36 PM2020-12-08T16:36:17+5:302020-12-08T17:36:40+5:30
राज्य सरकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
मुंबई
पोलिसांचे बळ वापरुन राज्यात ठिकठिकाणी जबरदस्तीने बंद करायला लावलं जात असून राज्य सरकारकडून 'भारत बंद' यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यात महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'लाही महाविकास आघाडीने समर्थन दिलं आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. पण राज्य सरकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
"पोलिसांचे बळ वापरुन राज्यात ठिकठिकाणी बंद करत असतानाची अनेक उदारहरणं समोर आली आहेत. वरळी नाक्यावर पोलिसांच्या माध्यमातून बंद करायला सांगितलं जात होतं. तर रायगडच्या महाड येथे एक पोलीस दंडुका हातात घेऊन बंद करायला सांगत असल्याचा फोटो माझ्याकडे आला आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून पोलिसांचा वापर करुन बंद यशस्वी झाला, असं दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.", असा थेट आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आजच्या भारत बंदला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतं नसल्याचे निदर्शनास आल्यावर सरकारी यंत्रणा व पोलीस बळाचा वापर करून बंद यशस्वी झाल्याचा केविलवाणा प्रयत्न होतं आहे.#FarmActGameChanger@Dev_Fadnavis@ChDadaPatil@BJP4Maharashtra@TV9Marathi@abpmajhatv@TheMahaMTBpic.twitter.com/PKQUfbOZ6G
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 8, 2020
"कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे हे चित्र देशात आहे. पंजाब आणि हरियाणातील काही मूठभर लोक सोडले तर या देशातील लोक या कायद्याच्या बाजूने आहेत. त्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनाची किंमत वाढणार आहे, दर्जा वाढणार आहे, मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला खुल्या बाजाराचा उपयोग करत आर्थिक हित साधता येणार आहे", असा दावा दरेकर यांनी केला आहे.