एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल; भाजपाला लवकरच देणार सोडचिठ्ठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 06:21 PM2020-09-29T18:21:24+5:302020-09-29T18:22:29+5:30
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली.
जळगाव - भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे हे महिनाभरात पक्ष सोडणार असून दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतिक्षा आहे असा संवाद असणारी ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, वरणगाव येथील ज्या तरुणासोबत संवाद झाला आहे तो तरुण आता ‘नॉट रिचेबल’ येत आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील काही जणांना षडयंत्राचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या अशी मागणी करीत आहे.
अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
काय आहे ऑडिओ क्लीपमधील संवाद?
व्हायरल झालेल्या या क्लीपच्या संवादानुसार सदर कार्यकर्त्याने खडसे यांच्याशी संवाद साधला आहे.
रविंद्र भंगाळे : ‘भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.
एकनाथ खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ.
एकनाथ खडसेंचा नकार
तो कॉल चुकीचा आहे. अशा बाबी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दिवसभर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक कॉल येतात, भाऊ भूमिका घ्या, असा आग्रह धरतात. - एकनाथ खडसे, माजी मंत्री
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीसांना मी मोठं केलं, पण...
देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपामधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, यात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता, त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली, तेव्हा हा मोठा नेता दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द एकनाथ खडसे आहेत असंही बोललं गेलं, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्याचा स्थानिक राजकीय समीकरणावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न शरद पवारांनी बैठकीत केला होता असं सांगितले गेले, परंतु या बातमीत तथ्य नाही सांगत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशावर मौन बाळगलं होतं.