“तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत हो, तुम्ही तर...”; मनसेनं श्रीमंत कोकाटेंची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:39 AM2021-08-17T11:39:29+5:302021-08-17T11:40:43+5:30

MNS : जातीपातीचे राजकारण करून लोकांना जगू द्यायचे नाही ही तुमची नीतिमत्ता आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारण केले नसते तर खूप मोठे नेते झाले असते.

Babasaheb Purandare, Raj Thackeray: MNS Rupali Patil Thombare Target Shrimant Kokate | “तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत हो, तुम्ही तर...”; मनसेनं श्रीमंत कोकाटेंची उडवली खिल्ली

“तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत हो, तुम्ही तर...”; मनसेनं श्रीमंत कोकाटेंची उडवली खिल्ली

Next

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुण्यातील मनसे आक्रमक झाली आहे. प्रविण गायकवाड आणि श्रीमंत कोकाटे(Shrimant Kokate) यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्यावरून मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला. त्यावर श्रीमंत कोकाटे यांनी पुणे कुणाच्या बापाचं आहे का? असं म्हणत प्रतिआव्हान दिलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. श्रीमंत कोकाटे यांच्या टीकेला मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी उत्तर दिलं आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, श्रीमंत नाव लावून कुणी श्रीमंत होत नसते, विचाराने, कृतीने श्रीमंत असावे लागते. तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत, तुम्ही तर दळीद्री विचाराचे आहात असा टोला त्यांनी कोकाटेंना लगावला आहे.

तसेच जातीपातीचे राजकारण करून लोकांना जगू द्यायचे नाही ही तुमची नीतिमत्ता आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारण केले नसते तर खूप मोठे नेते झाले असते. पदवीधर निवडणुकीत आमच्यापेक्षाही कमी मते मिळाली. हे पाहून दळीद्री विचार संपवा आणि विचाराने कर्तृत्वाने श्रीमंत व्हा कोकाटे असा खोचक सल्लाही रुपाली पाटील ठोंबरे यांनी श्रीमंत कोकाटेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते श्रीमंत कोकाटे?

देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादरमध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. मनसेच्या राज ठाकरेंना वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो. तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असं श्रीमंत कोकाटे म्हणाले होते.

प्रविण गायकवाड काय म्हणाले होते?

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

'परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की ! असेही ते म्हणाले आहेत.

Web Title: Babasaheb Purandare, Raj Thackeray: MNS Rupali Patil Thombare Target Shrimant Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.