'अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागास'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 06:45 AM2019-04-20T06:45:38+5:302019-04-20T06:45:40+5:30
कोकणात आजपर्यंत आमदार, खासदार, मंत्री झाले; मग कोकण कुठल्या कुठे असायला पाहिजे होता.
दासगाव : कोकणात आजपर्यंत आमदार, खासदार, मंत्री झाले; मग कोकण कुठल्या कुठे असायला पाहिजे होता. केरळ, गोवा ही दोन राज्ये पर्यटनावर पुढे गेली; पण कोकण तिथेच आहे, हे येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
या देशाला खोटे बोलणारा माणूस पंतप्रधानपदी मिळाला. नोटाबंदीतून नरेंद्र मोदींनी काय साध्य केले हे माहीत नाही; पण आता निवडणूक लढवण्यास काळा पैसा कुठून आला याचे उत्तर प्रथम दिले पाहिजे. नोटाबंदीतून साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे सगळे विषय मीडियावर दबाव आणून तुमच्यापर्यंत पोहोचवलेच नाहीत, असा आरोपही त्यांनी के ला.
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांची कोकणस्तरीय पोलखोल सभा महाड येथे शुक्रवारी झाली. या वेळी त्यांनी विविध विषयांना हात घालत शिवसेना-भाजप हे सत्तेसाठी लाचार बनलेले पक्ष आहेत, असे सांगतानाच जवानांच्या नावावर मते मागत फिरणाºया पंतप्रधानांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहनदेखील केले. जवानांच्या नावाने मते मागण्याची वेळ पंतप्रधानांवर आली आहे. एवढेच नाहीतर, जवानांचे फोटो लावून प्रचारसभेत भाषण करीत आहेत. अटलजींच्या काळात कारगिल युद्ध झाले; पण अटलजींनी बाजार मांडला नाही. मोदी आणि शहा हे देशावरचे संकट आहे. हे संकट दूर केले पाहिजे. याकरिता सर्वांनी एक होऊन काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीदेखील अनंत गीते यांच्या कामाचा समाचार घेतला. कोकणातील रायगडमध्ये अनंत गीतेंच्या नावाने एक निष्क्रिय खासदार लाभला. दिल्लीवरून येणारे थेट मातोश्रीवर देत असल्याने या निष्क्रिय खासदाराला पुन्हा तिकीट दिले गेले आहे, असा आरोप खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या वेळी केला. भगवा झेंडा उद्धव ठाकरे यांच्या हातात शोभत नाही तर तो केवळ राज ठाकरे यांच्या हातातच शोभतो, असेही खेडेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपचे आमदार आणि एकेकाळचे मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी पेण येथे मनसेवर टीका केली होती. या टीकेचा समाचार मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी घेतला. या वेळी दरेकर यांच्यावर निशाणा साधत राजसाहेबांनी तुम्हाला मोठे केले हे तुम्ही विसरलात. तुम्ही घरभेदी झालात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असे सांगून भाजपने दिलेले शब्द पाळले का हे आधी दाखवा, असे आवाहनदेखील अभ्यंकर यांनी केले.