बाळा नांदगावकर मनसे सोडणार? व्हायरल मेसेजवर खुद्द नांदगावकरांनीच दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:54 AM2021-12-17T07:54:43+5:302021-12-17T08:07:55+5:30
राज ठाकरेंच्या मनसे पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची यादी मोठीच आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजनं लक्ष वेधून घेतले आहे.
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) सध्या पक्ष बांधणीनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी मराठवाडा, पुणे दौरा केला. मराठवाडा दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरेंनी जिल्हा कार्यकारणीत महत्त्वाचे बदल केले. त्यामुळे अनेक जण दुखावले गेले. त्यानंतर पुणे दौऱ्यावर पोहचण्यापूर्वीच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला रामराम केल्याने मनसेला धक्का बसला. रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या पदांचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राज ठाकरेंच्या मनसे पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची यादी मोठीच आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजनं लक्ष वेधून घेतले आहे. कारण मनसे नेते बाळा नांदगावकर हे मनसे सोडणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. नांदगावकर पक्षाचा त्याग करणार किंवा पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकरांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडियाच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
तसेच त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही. कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही व जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते."तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम" अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
कोण आहेत बाळा नांदगावकर?
बाळा नांदगावकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घनिष्ट मित्र आहेत. शिवसेनेत असल्यापासून नांदगावकर आणि राज ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवसेना सरकारमध्ये असताना बाळा नांदगावकर हे गृहराज्यमंत्री होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेची स्थापना केली तेव्हा त्यांच्यासोबत बाळा नांदगावकरही मनसेत आले. ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेले बाळा नांदगावकर यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगूनच शिवसेनेतून बाहेर पडले. गेल्या १४ वर्षापासून बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंसोबत आहेत. २००९ मध्ये बाळा नांदगावकर शिवडी विधानसभेतून मनसेचे आमदार म्हणून निवडून आले होते.