तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात? मोदींचा कुमारस्वामींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:49 PM2019-04-09T19:49:02+5:302019-04-09T19:51:24+5:30
एअर स्ट्राइकवरुन पंतप्रधान मोदींची टीका
चित्रदुर्ग: बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. कर्नाटकातल्या चित्रदुर्गमधील सभेत मोदी बोलत होते.
'पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना मारल्यानं भारतातल्या काहींना दु:ख होत आहे. इथले मुख्यमंत्री तर आणखी एक पाऊल पुढे गेले. आपल्या सैन्याच्या शौर्याबद्दल बोलायचं नाही, असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या व्होट बँकेला धक्का लागतो. मला त्यांना विचारावंसं वाटतं, तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात?,' अशा शब्दांमध्ये मोदींनी कुमारस्वामींचा समाचार घेतला.
PM in Chitradurga,Karnataka: We attacked terror in Pakistan, but some people in India felt the pain. The CM here went a step further, he said talk of the valour of our forces should not be done, it damages his vote bank. I want to ask him, is your vote bank in India or Pakistan? pic.twitter.com/kN8SP0U8p2
— ANI (@ANI) April 9, 2019
पंतप्रधान मोदींनी म्हैसूरमधील जनसभेत हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर तोफ डागली. 'काँग्रेसच्या काळात जितक्या दहशतवादी घटना घडल्या, त्यांचे धागेदोरे पाकिस्तानशी संबंधित होते. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोट्या गोष्टी पसरवल्या. जेव्हा आमच्या सुपुत्रांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला चढवला, तेव्हा यांनी पुरावे मागितले. जम्मू-काश्मीरबद्दलचे यांचे आणि पाकिस्तानचे विचार सारखेच आहेत,' अशी टीका मोदींनी केली.
म्हैसूरमधील सभेत मोदींनी सबरीमालाचा मुद्दा उपस्थित केला. 'सबरीमालाबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच भाजपाच्या भावना आहेत. सबरीमाला मंदिराशी संबंधित आस्थेचा, परंपरेचा आणि पुजेच्या पद्धतीचा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. आस्थेशी संबंधित विषयांना घटनात्मक संरक्षण मिळून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू,' असं आश्वासन मतदारांनी मोदींनी दिलं.