अटीतटीच्या लढतीत उर्वरित उमेदवारांचे खाते मात्र बुडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:07 AM2019-04-18T01:07:26+5:302019-04-18T01:07:36+5:30
लोकसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत वा महापालिका निवडणुका असतो;
मुंबई : लोकसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत वा महापालिका निवडणुका असतो; या निवडणुकांमध्ये विजयाची खात्री नसली, तरीदेखील बहुतांशी उमेदवार हे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून निवडणूक लढवितात. मात्र, अशा निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त होऊ नये, म्हणून आवश्यक मते प्राप्त होत नसल्याने अनेक उमेदवारांची दांडी तर गुल होतेच; शिवाय डिपॉझिटही जप्त होते. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील सहा निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर येथेही प्रामुख्याने दोन उमेदवारांमध्ये लढत झाली असून, उर्वरित म्हणजे ८० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून यावेळी काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांची प्रामुख्याने लढत आहे. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील एकूण उमेदवारांची संख्या १८ असून, काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने चुरस आहे. उर्वरित उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून, काही अपक्ष आहेत. यापैकी किती जणांना यावेळी आपले डिपॉझिट वाचविण्यात यश येते, हे पाहणेदेखील तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, अपक्ष फॅक्टर जेवढा महत्त्वाचा ठरतो; तेवढाच आता मनसे फॅक्टरही महत्त्वाचा ठरू लागल्याचे चित्र सध्या तरी आहे.
>डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.