शेती संबंधित उत्पादनांना मोदींच्या सभेत बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 05:06 AM2019-04-18T05:06:40+5:302019-04-18T05:07:13+5:30
नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
नाशिक : आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी अधिक चिंतित असलेल्या राज्य सरकारच्या गृहविभागाने पिंपळगावी होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. गृहविभागाचे हे पत्र म्हणजे मोदी यांच्या सभेत शेतकरी गोंधळ घालण्याची शक्यता अधोरेखित करीत असून, त्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रचंड धास्तावली आहे.
गुप्तचर यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. असे असले तरी, कांदा व द्राक्षाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत येथे होणाºया या सभेत शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांदा, द्राक्षासह सर्वच शेतीमालाचे गेल्या पाच वर्षांत कोसळलेले भाव त्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापूर्वीच वेळोवेळी सरकारच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरला असताना आता तर प्रत्यक्ष देशाचा पंतप्रधानच दारी येत असल्यामुळे त्यांच्या समक्षच आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या सभेत गोंधळ घातला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय गुप्तचरांकडूनही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्याच्या गृहखात्याने पोलिसांना गोपनीय पत्र पाठवून ‘शेती संबंधित कोणतीही वस्तू सभास्थळी येणार नाही’ याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
>काळ्या कपड्यांना बंदी
२०१४च्या लोकसभा
निवडणुकीच्या प्रचारार्थ मोदी यांची तपोवनात सभा झाली होती. त्यावेळीदेखील किमान तीन वेळा त्यांच्या दौºयात बदल करण्यात आला. आता पाच वर्षांनंतर पुन्हा मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नाशिक जिल्'ाच्या दौºयावर येत आहेत. या वेळी होणाºया सभेत काळे कपडे परिधान केलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला असून, प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करूनच त्यांना सभास्थळी सोडण्यात येणार आहे.