मावळमधील पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे बारामतीकरांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:31 AM2019-03-13T02:31:11+5:302019-03-13T02:31:34+5:30
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आहे.
बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारीचे बहुतांश बारामती करांनी जोरदार स्वागत केले आहे. बारामती पॅटर्न राज्यात नावाजलेला आहे. त्यामुळे मावळची बारामती होईल, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. तर काहींनी ही उमेदवारी म्हणजे घराणेशाही लादल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
‘लोकमत’ने याबाबत बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी अनिता खरात म्हणाल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली निवड चांगलीच आहे. बारामतीच्या यशानंतर बारामतीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी थेट नेतृत्व केल्यास परिसराला फायदाच होईल. त्या ठिकाणी बारामती पॅटर्न राबविल्यानंतर मावळचा चेहरामोहरा बदलेल.
प्रा. अजय दरेकर म्हणाले, तरुण नेतृत्वाला संधी मिळणे देशाच्या परिसरासाठी पोषक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले हे नेतृत्व मावळला प्रगतीच्या दिशेने नेईल. त्यामुळे या उमेदवारीचे स्वागतच आहे. अमोल दोशी म्हणाले, घराणेशाही लादायला नको होती. त्याऐवजी स्थानिक उमेदवारी देणे अपेक्षित होते.
अमित परदेशी म्हणाले, पार्थ पवार नवखे असले तरी त्यांना घरातुनच राजकारणाचे बाळकडू आहे. अजित पवार यांना मतदारसंघाची चांगली जाण आहे. त्यामुळे पार्थ यांची उमेदवारी योग्यच आहे. राहुल जाधव म्हणाले, अजित पवार यांच्याच माध्यमातून पिंपरी चिंचवडचा कायापालट झाला आहे. त्यावरुनच पवार कुटुंबातील नेतृत्व विकासाचा वारसा पुढे नेण्याची क्षमता आहे.
रोहिदास बिनवडे म्हणाले, पार्थ पवार युवक नेतृत्व आहे. पवार कुटुंबातील असल्याने त्यांना चांगला जनाधार आहे. प्रश्न सोडविण्याची त्यांची चांगली क्षमता आहे. डॉ. लक्ष्मण पोंदकुले म्हणाले, चांगलाच निर्णय आहे. नवीन पिढीच्या हातात कारभार देण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. पवारांचा वारसा चांगला चालविला जाईल.
भारत कुंभार म्हणाले, तरुण पिढीला संधी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारभार पेलण्याची ताकत असलेले नेतृत्व आहे. सी. डी. तावरे म्हणाले, मावळमधून योग्य निवड झाली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहे. जाकीर सय्यद म्हणाले, नवीन विचार, नवीन जोश असेल तर काही अशक्य नाही. त्यातच पार्थ यांना पवार कुटुंबाचे पाठबळ असल्याने त्याचा मावळला फायदाच होईल.