लढाई गांधी-गोडसे यांच्यातील, सिद्धूंचा मोदींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:43 AM2019-04-19T04:43:31+5:302019-04-19T04:44:21+5:30
लोकसभा निवडणुका म्हणजे कृष्ण आणि कंस, राम आणि रावण यांच्यातील तसेच गांधी व गोडसे यांच्यातील युद्ध आहे, असे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू सभेत म्हणाले.
अहमदाबाद : लोकसभा निवडणुका म्हणजे कृष्ण आणि कंस, राम आणि रावण यांच्यातील तसेच गांधी व गोडसे यांच्यातील युद्ध आहे, असे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू सभेत म्हणाले. राफेल सौदा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यावरून सिद्धू यांनी मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला. ते म्हणाले की, चीन समुद्राखाली रेल्वे सुरू करत आहे पण भारतात मोदी मात्र चौकीदार तयार करत आहेत. तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना त्यांच्या होमपीचमध्ये टीकेचं लक्ष्य केलं होतं.
गुजरातमधील अहमदाबाद येथे नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. त्यामध्ये नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले आहे की होती, मोदी सांगतात मी फकीर आहे, मी स्वयंसेवक आहे, मी चौकीदार आहे पण तुम्ही हे का सांगत नाही मी पंतप्रधान आहे. मी ठामपणे सांगतो मोदी चोर आहेत अशी घणाघाती टीका नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यावर केली. अहमदाबादमधील धोलका येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
२०१४ साली नरेंद्र मोदी देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याच्या नावाखाली सत्तेवर आले मात्र आज ते सर्वांना चौकीदार बनवत आहेत. लोकशाही आज गुंडशाही झाली आहे. जे मोदींची भक्ती करतील ते देशभक्त आणि त्यांचा विरोध करतील ते देशद्रोही ठरतात. आम्हाला पंतप्रधान आणि भाजपाच्या समर्थकांकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र नको असा टोलाही नवजोत सिंग सिद्धू यांनी लगावला. इथे लोकांच्या एकवेळ जेवण मिळत नाही. उपाशी पोटी तुम्ही लोकांना योगा करायला सांगता? सर्वांना बाबा रामदेव बनवायचा आहे का? लोकांचे खिसे रिकामे अन् खाते उघडले जात आहेत असा चिमटा नवजोत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या खास शैलीत काढला.