Sanjay Raut: बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांच्या सभेचा धसका! स्टेजची केली मोडतोड; राऊतांनी दिला कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:05 PM2021-04-14T18:05:48+5:302021-04-14T18:08:41+5:30
Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनानं संजय राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊतबेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनानं संजय राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बेळगाव प्रशासनाकडून संजय राऊत यांच्या सभेच्या व्यासपीठाची मोडतोड केल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीनं करण्यात आला आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. पण सभा होण्याआधीच बेळगाव प्रशासनानं सभेला विरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड करण्यास सुरुवात केली आहे. खुद्द संजय राऊत यांनीही या घटनेसंदर्भात एक ट्विट केलं आहे आणि बेळगाव प्रशासनाला कडक शब्दात इशारा देखील दिला आहे.
"बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय", असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी ट्विटमधून दिला आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. तत्पूर्वी बेळगावात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
कोण आहे शुभम शेळके?
शुभम शेळके हे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही; पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी ठरले. त्यांचे नाव युवावर्गातून पुढे आले. आता त्यांच्या प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे. यामुळे मराठी म्हणून जो कोणी या मतदारसंघात आहे, त्याचे मत शुभम यांना पडावे, हे एकमेव ध्येय आता युवकांनी बाळगले आहे. शुभम शेळके याच्या प्रचारासाठी लोक स्वत:हून वर्गणी गोळा करत आहे. जिथे शुभम प्रचाराला जाईल तिथे लोकं ५०० ते १००० रुपयांची मदत करत आहेत. त्यामुळे भाजपा, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही शुभम शेळकेची दखल घेणं भाग पडत आहे.