"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:35 PM2021-01-18T20:35:50+5:302021-01-18T20:36:51+5:30
bengal assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.
कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यावर, गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असे म्हटले आहे.
सोमवारी सायंकाळी दक्षिण कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत शुभेंदु अधिकारी बोलत होते. यावेळी टीएमसी ही पार्टी नसून खासगी लिमिटेड कंपनी आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले. याचबरोबर, ममता बॅनर्जींच्या राजकीय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर तृणमूल काँग्रेसला बिहारमधून निवडणूक रणनीतिकार (प्रशांत किशोर) नियुक्त करण्याची गरज भासली असेल तर यामुळे हे सिद्ध होते की, राज्यात भाजपाची वाढ होत आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले.
याचबरोबर, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनीही जाहीर केले की, ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही, तर राजकारण सोडून देईन. ते म्हणाले, "जर नंदीग्राममध्ये मी त्यांना (ममता बॅनर्जी) दीड लाखाहून अधिक मतांनी हरवले नाही तर मी राजकारण सोडून देईन." दरम्यान, ममता बॅनर्जी यांना भवानीपुरमधून जिंकू येऊ, असा विश्वास नाही. त्यामुळे त्या नंदीग्राममध्ये निवडणूक लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीएमसीचे मंत्री सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. मात्र, ते कोठे जातात, यामुळे काही फरक पडत नाही, त्यांना काहीही मिळणार नाही, असे पश्चिम बंगालमधील भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.
ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली. यावेळी मला नंदीग्राममधून निवडणूक लढवायची आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी हे आवाहन स्टेट युनिटच्या अध्यक्षांना स्टेजवरच केले आणि तेथे तातडीने याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, यंदाही राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.