"बंगाल बनलाय अल कायदाचा अड्डा, येथील परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट"
By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 03:56 PM2020-11-15T15:56:20+5:302020-11-15T16:00:48+5:30
BJP News : भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे.
कोलकाता - भाजपाचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील कुचबिहार भागात कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या अनेक सदस्यांची ओळख पटवली गेली आहे, असा दावा दिलीप घोष यांनी केला आहे. बंगालमध्ये बसून हे दहशतवादी अल कायदाची मदत करत आहेत. ते देशातील शांतता बिघडवू पाहत आहेत. बंगालमध्ये या दहशतवाद्यांचे नेटवर्क विस्तारले आहे. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे, असेही दिलीप घोष यांनी सांगितले.
याबाबत दिलीप घोष म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल कायदाच्या सदस्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये विस्तारले आहे. हे राज्य दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहे.
यापूर्वी रविवारी दिलीप घोष म्हणाले होते की, भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला तर राज्यात लोकशाही पुन्हा स्थापित होईल. त्यासोबतच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही इशारा दिला होता. तृणमूलच्या सदस्यांनी आपली पद्धच बदलावी, अन्यथा त्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात जावं लागेल.
दिलीप घोष पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक ही केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना आतापर्यंत्र त्रास देणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पुढच्या सहा महिन्यांत सुधरावे. अन्यथा त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ येईल. त्यांचे हातपाय तोडले जातील.