राष्ट्रवादीकडून भालके, तर भाजपकडून आवताडे; पंढरपूर विधानसभा पाेटनिवडणूक उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:07 AM2021-03-30T06:07:40+5:302021-03-30T06:08:12+5:30
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके विरुद्ध भाजपकडून समाधान आवताडे असा सरळ सामना रंगणार आहे. एकास एक उमेदवार समोर असल्याने सहानुभूतीच्या लाटेतही भाजपने महाविकास आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
मंगळवारी समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बडे नेते हजेरी लावणार आहेत.
या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटवरून दिली.
भगीरथ भालके हे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव असून,
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
आहेत. २०१९च्या निवडणुकीत भारत भालके यांच्यासह त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
शिवसेना आणि स्वाभिमानीकडूनही अर्ज दाखल
महाविकास आघाडीतील शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी २०१४ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, तर २०१९ ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती.