'तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल', भाजपा आमदाराचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:24 PM2021-07-05T16:24:04+5:302021-07-05T16:28:08+5:30
Maharashtra Assembly Session 2021 : आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी 'अकेला देवेंद्र काफी है', असे म्हणत अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झाल्याचे पाहायला मिळाले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. यात आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत बोलताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचे नाव डांबराने लिहिले जाईल, अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes on Bhaskar Jadhav)
सोमवारी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचे नाव डांबराने लिहिले जाईल. धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केली. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो. मात्र, शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझे निलंबन करण्यात आले आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. याचबरोबर, ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचे निलंबन केले तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी 'अकेला देवेंद्र काफी है', असे म्हणत अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, आज विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला आहे. यानंतर ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. भाजपाकडून ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. दरम्यान, ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
"उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, मग ओबीसींसाठी का देत नाही?"https://t.co/pDYjijWhLX@BJP4Maharashtra@BJP4India@Dev_Fadnavis@ShivSena@NCPspeaks@ChhaganCBhujbal#OBCreservation
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021
मला आई- बहिणींवरुन शिवीगाळ केली - भास्कर जाधव
काही आमदारांनी मला आई- बहिणींवरुन शिवीगाळ केली. माझ्या अंगावर धावून आले, असे सांगताना आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस असल्याचे सांगत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा केला आहे. तसेच, भाजपाच्या आमदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधा पक्षाने सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
निलंबन झालेल्या आमदारांची नावे-
१. संजय कुटे
२. आशिष शेलार
३. गिरीश महाजन
४. पराग अळवणी
५. राम सातपुते
६. अतुल भातखळकर
७. जयकुमार रावल
८. हरीश पिंपळे
९. योगेश सागर
१०. नारायण कुचे
११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
१२. अभिमन्यू पवार