'मुंबईतील 'त्या' नऊ मजली इमारतीत भुजबळ कुटुंब राहतं, पण मालक दुसराच कुणीतरी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 03:10 PM2021-09-01T15:10:34+5:302021-09-01T16:25:34+5:30
kirit somaiya Slams bhujbal family: 'मुंबईत एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, आणि भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?'
नाशिक: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुंबईतील एका नऊ मजली इमारतीत भुजबळ कुटुंब राहत आहे. पण, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं', अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपनी पाहणी केली. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर टीका केली. 'मुंबईतील सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. पण, ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. या बिल्डिंगशी आणि परवेज कन्स्ट्रक्शनशी तुमचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला.
तसेच, मुंबईत एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, आणि भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली? इमारतीमध्ये राहण्याचं भाडं तुम्ही भरता की, ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इमारत बांधली तर बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे अनेक सवाल सोमय्या यांनी केले. तसेच, परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून ही कंपनी चालवणारे लोक बनावट आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
मालमत्ता जाहीर करावी
सोमय्या पुढे म्हणाले की, 2013 मध्ये आर्मस्ट्राँगची मी पाहणी केली, तेव्हा भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होतं. आज पुन्हा आम्ही पाहणी केली. आर्मस्ट्राँ इन्फ्रा, आर्मस्ट्राँ एनर्जीने मालेगावमधली गिरणा शुगर मिल विकत घेतली. गिरणा शुगर मिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. या कंपन्यांमध्ये जो पैसा आला तो कुठून आला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी केलं.