भाऊ की पुन्हा अनिलरावच?, लोकसभा उमेदवारी भाजपात संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:02 AM2019-03-05T01:02:18+5:302019-03-05T01:02:32+5:30
सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतही लोकसभेच्या पुणे मतदारसंघात उमेदवार कोण, याविषयी अजूनही संभ्रमच आहे.
पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतही लोकसभेच्या पुणे मतदारसंघात उमेदवार कोण, याविषयी अजूनही संभ्रमच आहे. पालकमंत्री गिरीश बापट ऊर्फ भाऊ बाजी मारणार की पक्ष म्हणून अनिलराव ऊर्फ अनिल शिरोळे यांनाच उमेदवारी देणार याची चर्चा आता पक्षसंघटनेतही सुरू झाली आहे. बापट यांनी उमेदवारी मागितल्यामुळे यात रंगत आली आहे.
मागच्या वेळीच बापट यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र ती माळ शिरोळे यांच्या गळ्यात पडली. ते तब्बल सव्वातीन लाख मतांच्या फरकाने ते निवडून आले व लोकसभेच्या या मतदारसंघात प्रथमच भाजपाचा झेंडा फडकला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापट यांनी आपला कसबा मतदारसंघ कायम राखला व सत्ता आल्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानही मिळवले. आता बापट पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागत असल्याची चर्चा आहे. स्वत: बापट यांनी याबाबत काहीही जाहीर वक्तव्य केले नसले तरी त्यांच्या समर्थकांकडून मात्र भाऊंना आता लोकसभेचे वेध लागले असल्याचे बोलले जात असते.
दुसरीकडे विद्यमान खासदार शिरोळे यांनीही उमेदवारीसाठी आपली ताकद पणाला लावली आहे. गेल्या साडेचार वर्षातील कामाचा ताळेबंद ते वारंवार मांडत आहेत. जाहीर स्नेहमिलन मेळावा घेऊनच त्यांनी आपल्या उमेदवारीचे बिगुल वाजवले आहे. तसेच पुण्याचे पाणी व अन्य काही विषयांवर आक्रमक भूमिका घेऊन आपली प्रतिमा मतदारांसमोर कायम राहील याचीही काळजी घेतली आहे. अनिलरावांना (जवळच्या कार्यकर्त्यांमधील नाव) उमेदवारीची काहीच अडचण नाही असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी मात्र उमेदवारीबाबत अजून हाताची घडी तोंडावर बोट अशीच
भूमिका ठेवल्यामुळे संभ्रम वाढत चालला आहे.
योगेश गोगावले यांच्या भुमिकेकडे लक्ष
पक्षाच्या शहर शाखेत या दोन्ही नावांची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी निकटच्या काही कार्यकर्त्यांबरोबर खासगीत बोलताना आपणही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सूतोवाच केले होते, मात्र त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद हवी असेल असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे सध्या भाऊ की अनिलराव, अशा दोन नावांभोवतीच सर्व चर्चा घोटाळते आहे.