बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 12:49 PM2021-07-25T12:49:05+5:302021-07-25T12:50:16+5:30
Jitendra Awhad News: कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे
मुंबई - मुसळधार पावसामुळे आलेला महापूर आणि भूस्खलनामुळे कोकणासह सातारा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनांमध्ये शेडको लोकांचा बळी गेला आहे. पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यावर आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर २७ जुलै रोजी होणारे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा आव्हान यांनी केली आहे.
याबाबतची घोषणा करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात की, कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल.दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
दरम्यान, महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे चाळीसहून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे. परंतु आता म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा नव्याने गाव वसविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन केली होती. त्यानुसार जेवढी घरे यात जमीनदोस्त झाली आहे, तेवढी पक्की घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.